मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आता फूड ट्रकला परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या महिन्यातच याबाबत महापालिकेने एक ठराव पास केला होता. त्यानुसार आता अधिकृतपणे बीएमसीने निविदा काढली आहे. मुंबईतील कुलाबा आणि कफ परेड भागात सुरुवातीच्या टप्प्यात फूड ट्रकला परवानगी दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात फूड ट्रकला परवानगी दिली जाईल असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
Table of contents [Show]
24 तास उपलब्ध असतील फूड ट्रक
परवानगी असलेल्या फूड ट्रकला 24 तास सेवा देता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या निविदेनुसार केवळ कोळी आणि मच्छिमार समुदायातील नागरिकांना फूड ट्रकची परवानगी दिली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोळी महिला बचत गटांना फूड ट्रकची परवानगी दिली जाणार आहे.
शाळा, उद्याने, रहदारीच्या ठिकाणांवर फूड ट्रक सुरु करता येणार आहे. नियमानुसार कुठल्याही हॉटेलपासून 200 मीटरच्या अंतरावर फूड ट्रक उभा करता येणार आहे. दोन फूड ट्रकच्या दरम्यान 15 फुटांचे अंतर असायला हवे असे देखील महापालिकेने जाहीर केले आहे.
मुंबईकरांची सी-फूडला पसंती
मासेमारी हा कोळी समुदायाचा परंपरागत व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षांपासून कोळी पद्धतीने बनवलेल्या खाद्यान्नाना खवय्यांची मोठी लोकप्रियता लाभते आहे. फूड ट्रक व्यवसायाला सुरुवात झाल्यास सामान्य मुंबईकरांना अल्पदरात सी फूडचा आस्वाद घेता येणार आहे.
बांगडा, सुरमई, पापलेट, मांदेली, रावस, मोरी, बोंबील, कोळंबी, हलवा,जवळा, सुकटीची चटणी, तांदळाची भाकरी, घावण, सोलकढी इत्यादी पदार्थ आता लोकांना फूड ट्रकवर चाखता येणार आहेत.
महिला बचत गटांना मिळणार रोजगार
सुरुवातीच्या टप्प्यात कोळी महिला बचत गटांना फूड ट्रकची परवानगी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरात होणाऱ्या खाद्य मेळाव्यांमध्ये (Food Festival) आगरी-कोळी पद्धतीच्या जेवणाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सी फूड महाग असल्यामुळे सामान्यांना खाणे परवडत नाही. परंतु फूड ट्रकला परवानगी मिळाल्यानंतर महिला बचत गटांना स्वस्तात सी-फूड उपलब्ध करून देता येणार आहेत. यातून महिलांना रोजगाराची संधी प्राप्त होईल आणि बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कोळीवाडा सौंदर्यीकरण योजना
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त (मुंबई शहर) आशिष शर्मा यांनी कोळीवाडा सौंदर्यीकरण योजना आखली आहे. मुंबईतील कोळीवाडे ही मुंबईची खरी ओळख आहे. कोळीवाड्यांची खाद्य संस्कृती, परंपरा यांचे जतन आणि संवर्धन करण्याची मुंबई महापालिकेची योजना आहे. यासाठीचा खर्च जिल्हा नियोजन निधीतून केला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. यासाठी अंदाजे 34 लाख 50 हजार रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.