Food Inflation In India: महागाईच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत. दैनंदिन आहारातील पॅकेज्ड फूड, स्नॅक्स खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपन्या FMCG क्षेत्रामध्ये येतात. मात्र, महागाईमुळे कंपन्यांनीही दरवाढ केली आहे. 89% भारतीयांना अन्नपदार्थ खरेदी करताना महागाई जाणवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे बाजारातील वस्तू खरेदीचा पॅटर्न देखील बदल आहे.
स्वस्त वस्तू खरेदीकडे कल
स्नॅक्स म्हणजेच नाष्ट्यासाठीचे पॅकेज्ड पदार्थ खरेदी करताना ग्राहक किंमतीचा विचार पूर्वीपेक्षा जास्त करू लागले आहेत. (Snacks Price hike) एखाद्या कंपनीची वस्तू महाग असेल तर त्याऐवजी स्वस्तातील वस्तू खरेदीकडे अनेकांचा कल आहे. तसेच ग्राहकांचे शॉपिंग बास्केटही हलके झाले आहे. चॉकलेट निर्मिती क्षेत्रातील बलाढ्या Mondelez International या कंपनीने याबाबत अभ्यास केला आहे. भारतासह 13 देशांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.
शेव, चॉकलेट, बिस्टिक, चिप्स, चॉकलेट बार यासंह अनेक पदार्थ स्नॅक्स कॅटेगरीत येतात. ही उत्पादने विरंगुळा म्हणून किंवा भूक लागल्यानंतर तात्पुरता सहारा म्हणून खाल्ले जातात. (Snacks Price hike) मात्र, किंमतवाढीमुळे स्नॅक्स खरेदी महाग झाली आहे. 76% भारतीय दिवसातून दोनदा हलके अन्नपदार्थ खातात. सकाळच्या वेळी स्नॅक्स उत्पादनांचे सेवन जास्त होते. हे प्रमाण जागतिक प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे अभ्यास म्हटले आहे.
दरवाढ झाली असली तरी 82% भारतीय त्यांचे आवडते पदार्थ खरेदी करण्यासाठी जास्त किंमत मोजण्यास तयार आहेत. तरुण पिढीकडून ऑनलाइन स्नॅक्स ऑर्डर करण्याचे प्रमाणही मोठे आहे. तसेच यातील 94% आधी स्नॅक्स पदार्थाची ऑनलाइन माहिती मिळवतात. त्यानंतरच खरेदी करतात, असे अभ्यासातून समोर आले आहे. स्नॅक्समध्येही बिस्किट आणि कुकीज भारतीय सर्वाधिक खातात. त्याखालोखाल साल्टेड स्नॅक्स आणि चॉकलेटचा खप होतो.
FMCG क्षेत्राची ग्रामीण भागात वाढ खुंटली
ग्रामीण भागातील मागणी पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. त्यामुळे FMCG क्षेत्राची वाढ जानेवारी-मार्च या तिमाहीत सर्वसाधारण राहणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप याची आकडेवारी हाती आली नाही. कडक उन्हाळा आणि अवकाळ पावसाचा देखील FMCG क्षेत्रावर परिणाम झाला आहे. एकूण FMCG मार्केटपैकी 40% बाजारपेठ ग्रामीण भागात आहे. महागाईमुळे सुमारे निम्म्या लोकसंख्येने शीतपेये, पाकिटबंद अन्नपदार्थ, साबण, ज्यूस हॉटेलचे खाणे यावरील खर्च कमी केल्याचे कंतार (Kantar) या कंपनीने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.