Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cryptocurrency Regulation: क्रिप्टोकरन्सीवर G20 बैठकीत चर्चा व्हावी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची अपेक्षा

Cryptocurrency Regulation

क्रिप्टोकरन्सीवर अद्याप जागतिक स्तरावर कोणतेही धोरण नाही. मागील काही वर्षात क्रिप्टो मार्केट अनेक वेळा कोलमडले आहे. त्यामुळे G20 बैठकीत याबाबत सखोल चर्चा व्हावी अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. IMF आणि FSB कडून क्रिप्टोवर टेक्निकल पेपर सादर करण्यात येणार आहे. या पेपरच्या आधारे पॉलिसी तयार केली जाऊ शकते.

Cryptocurrency Regulation: क्रिप्टोकरन्सी या व्हर्च्युअल चलनाबाबत भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अद्याप स्पष्ट कायदे अस्तित्वात नाहीत. या करन्सीमधील व्यवहार अद्यापही पूर्ण सुरक्षित नाहीत आणि त्यावर सरकारने पूर्णत: नियंत्रण नाही. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्रालायने क्रिप्टोकरन्सीतील व्यवहार मनी लाँड्रीग कायद्याखाली आणले आहेत. दरम्यान, भारतामध्ये G-20 च्या बैठका सुरू आहेत. या बैठकीतील अजेंड्यावर क्रिप्टोकरन्सी हा विषय देखील आहे.

"क्रिप्टोवर चर्चा व्हायला हवी"

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी क्रिप्टो करन्सीबाबत वक्तव्य केले आहे. (FM Nirmala Sitaraman on Crypto) "क्रिप्टो करन्सीबाबत संपूर्ण करार झाला नाही तरी G-20 देशांच्या बैठकीत चर्चा व्हायला हवी, असे त्या म्हणाल्या. अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले. क्रिप्टो बाजारात मागील काही वर्षात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या. तसेच बाजारही कोलमडून पडला. त्यामुळे यावर नियंत्रण येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

क्रिप्टोसंबंधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर धोरणाची गरज 

G-20 देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक उद्यापासून (12 एप्रिल) अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे होणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची बैठकही येत्या काही दिवसांत होणार आहे. या पाश्वभूमीवर निर्मला सितारामन यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत वक्तव्य केले. क्रिप्टोकरन्सीबाबत जागतिक स्तरावर धोरण असावे, असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, क्रिप्टो व्यवहारांवर कसे नियंत्रण आणता येईल याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. काही देशांनी क्रिप्टोकरन्सी व्यापारावर निर्बंध देखील आणले आहेत. 

IMF आणि FSB क्रिप्टोवर पेपर सादर करणार

फेब्रुवारी महिन्यात बंगळुरु येथे G20 गटाची बैठक झाली होती. त्यामध्ये क्रिप्टोकरन्सी धोरणाबाबत चर्चा झाली. IMF आणि स्वित्झरलँड येथील Financial Stability Board (FSB) या दोन संस्थांनी मिळून क्रिप्टोकरन्सीबाबत एक टेक्निकल पेपर सादर करावा. या पेपरमध्ये  क्रिप्टोबाबत जागतिक स्तरावर काय धोरण असावे, याचा समावेश असेल, असे बैठकीत ठरले. जागतिक अर्थव्यवस्था आणि क्रिप्टोकरन्सीचा त्यावर होणार परिणाम अशा आशयाचा हा पेपर असेल.

IMF-FSB ने तयार केलेले पेपर सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केला जाईल. त्याआधी हा पेपर जुलै महिन्यात चर्चेसाठी ठेवला जाईल. G20 गटांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर या चर्चेला उपस्थित असतील. या बैठकीत क्रिप्टोकन्सीबाबत पेपरमधील मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर क्रिप्टोवर धोरण तयार होण्याची शक्यता आहे. 14 एप्रिललाही क्रिप्टो करन्सीचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरात बैठक आहे.

FTX चा डोलारा कोसळला

FTX क्रिप्टो एक्सचेंज मागील वर्षी कोसळला. कंपनी अचनाक बंद झाल्याने गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेण्यासाठी गोंधळ घातला होता. त्यावेळी बिटकॉइन (Bitcoin), इथेरिअम (Ethereum), बायनान्स (Binance) सारख्या क्रिप्टो करन्सीच्या किंमतीत प्रचंड घसरण झाली होती. सलग दहा महिन्यानंतर आता कुठे क्रिप्टो मार्केट पुन्हा वरती येत आहे. मात्र, क्रिप्टो बाजारामध्ये सतत चढउतार सुरू असते. त्यावर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण नाही. FTX कंपनीमध्ये भ्रष्टाचार, नियमांचे उल्लंघन, निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले होते. 

भारताकडे या वर्षीचे G20 परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे भारतातील विविध शहरांत वर्षभर बैठका सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रीतील प्रमुख शहरांचा समावेश आहे. पर्यावरण बदल, सरकारी कर्ज, सर्वसमावेशक विकास, क्रिप्टोकरन्सी, उद्योग, व्यापार, ग्रामीण विकास, रोजगार अशा मुद्द्यांवर विविध बैठका सुरू आहेत.  G20 देशांचे मंत्री आणि उच्चपदस्थ बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत.