बॅंकांनी ऑगस्ट महिन्यात फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये वाढ करून ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे ज्यांना फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करायची आहे. ते या बॅंकेत पैसे गुंतवू शकतात. विशेष म्हणजे ही वाढ सामान्य नागरिक आणि जेष्ठ नागरिक या दोन्हींसाठी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अॅक्सिस बॅंकेनेही त्याच्या एका मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर वाढ केली होती. आता या 4 बॅंकांमध्ये तिचाही समावेश आहे. त्यामुळे ज्यांचे या बॅंकांत खाते आहे, ते या एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात.
Table of contents [Show]
अॅक्सिस बँक (Axis Bank)
याच महिन्यात अॅक्सिस बँकेने एका मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर वाढ केली होती. आता बॅंकेने जेष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांच्या एफडीच्या व्याजदरावर वाढ केली आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर बॅंक 3.5 ते 8.05 टक्के व्याज देत आहे. तसेच, सामान्य ग्राहकांसाठी बॅंक एफडीवर 3.5 ते 7.3 टक्के व्याज देत आहे. मात्र, हे व्याजदर फक्त 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर देण्यात येत आहे. हा व्याजदर 14 ऑगस्टपासून बॅंकेने लागू केला आहे. याचबरोबर, अॅक्सिस बँक 16 महिने ते 17 महिन्याच्या कमी मुदतीच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर 8.05% व्याज देत आहे.
फेडरल बॅंक (Federal Bank)
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फेडरल बँकेने 15 ऑगस्ट 2023 पासून फिक्स्ड डिपाॅझिटवर वाढ करण्याची घोषणा केली. बँकेने निवडक मुदतीसाठी जेष्ठ नागरिकांना स्टॅंडर्ड रेटपेक्षा 77 बेसिस पॉईंट्सची (Basis Points) वाढ केली आहे. त्यामुळे 13 महिन्यांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर जेष्ठ नागरिकांना 8.07 टक्के आणि सामान्य नागरिकांना 7.30 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच, हे वाढीव दर मर्यादित अवधीसाठीच उपलब्ध राहणार असल्याची माहिती बॅंकने दिली आहे.
सूर्योदय स्माॅल फायनान्स बॅंक (SSFB)
सूर्योदय स्माॅल फायनान्स बॅंकने 5 वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटच्या व्याजदरात 85 बेसिस पॉईंट्सची (Basis Points) वाढ केली आहे. बॅंक सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपाॅझिटवर 4.00 ते 8.60 टक्के व्याज देत आहे. तसेच, जेष्ठ नागरिकांना बॅंक 4.50 ते 9.10 टक्के एफडीवर व्याज देत आहे. हा दर बॅंकेने 7 ऑगस्टपासून लागू केला आहे.
कॅनरा बॅंक (Canara Bank)
कॅनरा बॅंकेनेही त्यांच्या व्याजदरात वाढ केली असून जेष्ठ नागरिकांना एफडीवर 4 ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे. तसेच, बॅंक सामान्य नागरिकांना त्यांच्या एफडीवर 4 ते 7.25 टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर नागरिकांना 12 ऑगस्टपासून देण्यात येत आहे.