चालू आर्थिक वर्षातील पहिल्याच तिमाहीत वित्तीय तूट वाढली आहे. एप्रिल ते जून वित्तीय तूट 4.51 लाख कोटींवर गेली असून अर्थसंकल्पातील अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 25.3% इतके आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तूट वाढल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत वित्तीय तूट 21.2% इतकी होती. यंदा सरकारचा खर्च हा उत्पन्नाच्या तुलनेत दुपटीने झाला आहे. पहिल्या तिमाहीत सरकारला करातून 5.99 लाख कोटींचा महसूल मिळाला. याच काळात सरकारने 10.51 लाख कोटी विविध योजनांवर खर्च केले. बजेटच्या तुलनेत हे प्रमाण 22.1% आणि 23.3% इतके आहे.
बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.9% (जीडीपीच्या तुलनेत) इतकी मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या वर्षी वित्तीय तूट 6.4% इतकी होती.
सरकारच्या महसुलाचा विचार केला तर सरकारला पहिल्या तिमाहीत एकूण 58.86 लाख कोटींचा महसूल मिळाला. यात करातून 43.36 लाख कोटी मिळाला. बिगर कर महसुलातून सरकारला 15.50 लाख कोटी मिळाले.
रिझर्व्ह बँकेकडून सरकारला यंदा 87 हजार 416 कोटींचा लाभांश मिळाला होता. त्यामुळे सरकारला मोठा आधार मिळाला. महसुली तूट मर्यादित राहिली. बजेटनुसार टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू अनुक्रमे 18.6% आणि 51.4% इतका राहिला.