Cyber Security: सायबर सुरक्षेतील निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या ठेवींना धक्का पोहचल्यामुळे आरबीआयने देशात पहिल्यांदाच एका कॉ-ऑपरेटिव्ह बँकेविरुद्ध कारवाई केली. हैदराबाद येथील ए पी महेश कॉ-ऑपरेटिव्ह बँकेला 65 लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआय आणि हैदराबाद पोलिसांनी केलेल्या तपासणीत बँकेच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चुका आढळून आल्या होत्या. बँकेच्या निष्काळजीपणामुळे हॅकर्सनी ठेवींवर डल्ला मारला होता.
हॅकर्सकडून 12 कोटी रुपये लंपास
ए पी महेश कॉ-ऑपरेटिव्ह बँक ही हैदराबाद शहरामध्ये आहे. जानेवारी 2022 मध्ये हॅकर्सनने बँकेच्या सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेत 12.48 कोटी रुपये बँकेच्या खात्यातून वळवले होते. बँकेची सायबर सुरक्षा अपुरी असल्याचे हैदराबाद पोलिसांच्या ऑडिटमध्ये आढळून आले होते. त्यानंतर आरबीआयानेदेखील या प्रकरणी चौकशी केली. यामध्ये बँकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने आरबीआयने दंडात्मक कारवाई केली.
कसा झाला घोटाळा?
बँकेची सायबर सुरक्षा कमकुवत असल्याचे हॅकर्सच्या लक्षात आल्याने त्यांनी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेल पाठवण्यास सुरुवात केली होती. हॅकर्सनी फिशिंग पद्धतीचा वापर केला. कर्मचाऱ्यांना बनावट लिंक असलेले मेल पाठवले. मात्र, हे मेल खरे असल्याचे भासवले. ज्या कर्मचाऱ्यांनी मेलमधील लिंक वर क्लिक केले त्याद्वारे हॅकर्सने बँकेच्या डेटाबेसमध्ये प्रवेश केला. तसेच 12.48 कोटी रुपये वळते केले. या प्रकरणानंतर बँकेने सायबर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती.
डेटा सुरक्षेबाबत बँकेने केली तडजोड
ए पी महेश कॉ-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नव्हत्या. बँकेकडे अँटी-फिशिंग अॅप्लिकेशन नव्हते. तसेच डेटा घुसखोरी आणि तपास करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. तसेच रिअल टाइम थ्रेट डिफेन्स व्यवस्था नव्हती. सायबर सुरक्षा बाळगण्यासाठी ही व्यवस्था आरबीआयद्वारे अनिवार्य आहे. मात्र, बँकेने ग्राहकांच्या माहितीबाबत निष्काळजीपणा केल्याचे पुढे आले.
भारतातील मोठे बँकिंग फ्रॉड
2016 साली येस बँकेच्या 32 लाख ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटाची चोरी झाली होती. एटीएम मशिनद्वारे हॅकर्सने ग्राहकांची माहिती चोरी केली. हा देशातील बँकिंग सिस्टिमवरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. या ग्राहकांची माहिती हॅकर्सच्या हाती लागली होती. मात्र, त्यानंतर योग्य त्या उपाययोजना करत डेटा सुरक्षित करण्यात आला होता. भारतातील इतरही आघाडीच्या बँकांच्या डेटा चोरीचा प्रयत्न झाल्याचे प्रकार या आधी समोर आले आहेत.