भविष्यातील गोष्टींचा विचार करून दिर्घकालीन आर्थिक गुंतवणूक (Long Term Financial Investment) करणे गरजेचे आहे. या गुंतवणुकीमध्ये मुलांचे उच्च शिक्षण, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन इ. गोष्टी समाविष्ट करण्यात आलेल्या असतात. पर्सनल फायनान्स प्लॅटफॉर्म फिनोलॉजी इंडियाने (Finology India) भारतीय लोकांच्या आर्थिक नियोजनाबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे. हा अहवाल 3 लाख लोकांचे सर्वेक्षण करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये लोकांच्या पैशांसंदर्भातील सवयीचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालातून भारतीयांच्या आर्थिक नियोजनाबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या माहितीनुसार देशातील 75 टक्के लोकांकडे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कोणताही फंड नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
प्रत्येक सहावा भारतीय कर्जाच्या विळख्यात
फिनोलॉजी इंडियाने सादर केलेल्या अहवालात लोकांच्या पैशांच्या सवयीचा अभ्यास करण्यात आला आहे. यामधील माहितीनुसार दर चार भारतीयांपैकी एक भारतीय असा आहे की, जर त्याला नोकरी गमवावी लागली तर त्याच्याकडे पुढील महिन्याच्या खर्चासाठी पैसे नाहीत. या सर्वेक्षणात 29 टक्के लोकांनी त्यांचा पगार 15 दिवसांपेक्षा जास्त पुरत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते कर्जाचा EMI देखील परत करू शकत नाहीत असे निदर्शनास आले आहे.
फिनोलॉजीच्या या सर्वेत लोकांच्या कर्जाच्या (Loan) परतफेडीचा अभ्यास करण्यात आला आहे. या सर्वेमधील माहितीनुसार प्रत्येक सहावा भारतीय कर्जाच्या जाळ्यात अडकला आहे. हे कर्ज वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे 57 टक्के लोकांनी आपली गुंतवणूक विकून कर्जाची परतफेड केली आहे. तर 24 टक्के लोकांनी दुसरे कर्ज घेऊन पहिल्या कर्जाची परतफेड केली आहे. 5 टक्के लोक कर्जाची परतफेड करण्यासाठी मित्रमैत्रिणींकडून किंवा कुटुंबाकडून पैसे उसने घेणार आहेत. तसेच 15 टक्के लोक EMI वगळण्याचा विचार सध्या करत आहेत.
बचतीचा 'हा' सोपा पर्याय निवडा
‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. त्याच प्रमाणे बचत ही कधीच मोठ्या प्रमाणावर एकदम होत नाही. दररोज थोडी थोडी करून ती मोठ्या प्रमाणावर करता येते. बचत करताना तुम्ही खर्चाचे नियोजन करा. आवश्यक आणि खर्चाच्या गोष्टींची गणना करून बजेट प्लॅन तयार करा. जेणेकरून बचतीसाठी मदत होईल. त्यासाठी तुनच्याकडे दोन बँक खाते असणे आवश्यक आहे. एका बँक खात्यात तुमचा मासिक पगार जमा होईल, तर दुसऱ्या खात्यात बचत करण्यात येईल. मासिक पगार जमा होणाऱ्या खात्यामधूनच तुम्ही खर्च करू शकता. दुसरे बँक खाते हे केवळ बचतीसाठी वापरावे.
मासिक उत्पन्नातून थोडा थोडा निधी आपत्कालीन परिस्थितीसाठी साठवून ठेवा. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या किमान 6 पट रक्कम तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून असायला हवी. हा फंड तुम्ही इतर कोणत्याही कामासाठी खर्च करू नये. मासिक आधारावर ही रक्कम वाढवली तर एका ठराविक काळानंतर तुमच्याकडे मोठा फंड तयार होऊ शकतो.
आर्थिक गुंतवणूक का करावी?
माणसाचे आयुष्य कधीच साधे सरळ नसते. त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. कोविड महामारी दरम्यान अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तर सध्या नोकरकपातीचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पुरेसा निधी असणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे पुरेसा निधी असेल, तर कर्ज काढण्याची वेळ येत नाही किंवा कोणापुढेही हात पसरावे लागत नाहीत. बँक खात्यावर पैसे असतील, तर हवे तेव्हा पैसे काढता येतात आणि आर्थिक अडचण सोडवता येते.
Source: hindi.news18.com