Fingerprint Banking: बायोमॅट्रिक प्रमाणीकरण हे आपल्यासाठी नवीन नाही. पण बायोमॅट्रिक प्रणालीचा वापर करून त्याद्वारे पेमेंट करणे हे तंत्रज्ञान आपल्यासाठी नक्कीच नवीन असू शकते. कारण सध्या कॉर्पोरेट ऑफिसेसमधून आणि नवीन आधारकार्ड काढताना किंवा त्यात बदल करण्यासाठी बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशनचा उपयोग केला जात आहे.
मागील 15 दिवसांमध्ये सोशल मिडियावर चीनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात असे दाखवण्यात आले होते की, एका स्टोअरमध्ये ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर, त्या वस्तुचे पैसे देण्यासाठी फक्त एका मशीनवर तळहात दाखवून त्याचे पेमेंट करतो. या पेमेंट पद्धतीला बायोमॅट्रिक पेमेंट नक्कीच म्हणून शकतो. कारण या प्रणालीमध्ये शारीरिक गुणधर्माचा वापर करून बँकेतून पेमेंट करण्यात आले होते.
Table of contents [Show]
पॉईंट ऑफ सेल तंत्रज्ञान
बायोमॅट्रिक पेमेंटमध्ये पॉईंट ऑफ सेल (Point Of Sale-POS) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यात शारीरिक गुणधर्मांचा वापर करून युझर्सची ओळख पटवली जाते आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे कट होतात. बायोमॅट्रिक प्रमाणीकरणासाठी सध्या तरी हाताच्या बोटांचा वापर केला जात आहे. यामध्ये बायोमॅट्रिक प्रणाली टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करते.
बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाचे प्रचलित प्रकार
फिंगरप्रिंट (Fingerprint Scanners)
फिंगरप्रिंट हा सर्वांत प्रचलित असलेला बायोमॅट्रिक प्रमाणीकरणाचा प्रकार आहे. यात मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रणालीचा वापर केला जातो. सध्या ही प्रणाली काही ठराविक बँकांनी एटीएममध्ये उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीचा वापर करून ग्राहक एटीएममधून कार्डविना पैसे काढू शकतात.
चेहरा (Facial recognition)
सध्या चेहऱ्याद्वारे ओळख पटविणारे तंत्रज्ञान मोबाईलमध्ये वापरले जात आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्याची ओळख पटवली जाते. यासाठी त्या तंत्रज्ञानाला संबंधित चेहऱ्याचे नमुने देऊन त्याद्वारे ही प्रणाली काम करते.
आवाज (Voice identification)
आवाजाच्या सहाय्याने संबंधित व्यक्तीचे गुणधर्म ओळखून त्यानुसार ही प्रणाली काम करते. या प्रणालीमधील व्हॉईस आयडेन्टिफिकेशन तंत्रज्ञान हे बोलणाऱ्याचा आवाज मॅच करून त्यानुसार काम करते.
डोळे (Eye scanners)
डोळ्यांद्वारे दोन प्रकारचे स्कॅनर काम करतात. त्यातील एक आहे रेटिना स्कॅनर आणि दुसरा आयरिस रेकग्निशन स्कॅनर. रेटिना स्कॅनरमध्ये पूर्वीच स्कॅन केलेले आणि सेव्ह केलेले नमुने मशीन पडताळून त्यांची ओळख पटवते आणि ठरवून दिलेल्या प्रोग्रॅमनुसार काम करते.
बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षिततेसाठी
फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता फक्त पिन क्रमांक किंवा पासवर्ड तितकेसे सुरक्षित राहिलेले नाही. तंत्रज्ञानाचा जसा चांगल्या गोष्टीसाठी वापर केला जातो. त्याचप्रमाणे त्याचा दुरूपयोग करणारेही आहेत. त्यामुळे अधिक सुरक्षिततेसाठी बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मायक्रोसॉफ्ट आणि इंटेलसारख्या जागतिक स्तरावरील कंपन्या या मोबाईल बँकिंगसाठी बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तसेच बायोमॅट्रिक तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन बँकिंग सुरक्षित आणि सोपी झाली आहे.