बिपराजॉय चक्रीवादळाच्या सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्रकिनाऱ्यालागत असलेल्या गावांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या वादळाचा सर्वात जास्त फटका हा गुजरात राज्याला बसणार आहे. जवळपास 72,000 नागरिकांचे याआधीच स्थलांतर केले गेले आहे. दक्षता विभाग याबाबत काळजी घेत असताना अर्थ विभागाने देखील आता कंबर कसलीये. आज खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँका आणि विमा कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक घेतली आहे.
बिपरजॉय हे अंत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हणून हवामान खात्याने वर्गीकृत केले आहे. त्यामुळे याबाबत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसेल असा अंदाज होता. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रात फारसे नुकसान झालेले नाहीये. मात्र गुजरात राज्यात या वादळाचा प्रभाव अधिक असेल असे सांगितले गेले आहे. वित्त मंत्रालयाने याबाबत ट्विट करत नागरिकांना माहिती दिली आहे. बिपराजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याची सूचना मंत्रालयाने केली आहे. सोबतच बँकांना आणि विमा कंपन्यांना काही महत्वाच्या सुचना देखील केल्या आहेत.
बिपराजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बँका आणि विमा कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे असे निर्देश वित्त मंत्रालयाने दिले आहेत. तसेच बँकांनी आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील याबाबत सूचना करायच्या आहेत असेही सांगितले गेले आहे.
Smt @nsitharaman today chaired a meeting of Managing Directors and senior officials of various banks and insurance companies via VC to review their preparedness in view of the impending #CycloneBiparjoy. Secretary @DFS_India was also present during the meeting. (1/n) pic.twitter.com/7wnOcUmGka
— NSitharamanOffice (@nsitharamanoffc) June 14, 2023
कर्मचाऱ्यांची काळजी घ्या
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बँका आणि विमा कंपन्या सुरूच राहणार आहे. या दरम्यान कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या अन्न आणि औषधींची देखील काळजी बँकांनी आणि विमा कंपन्यांनी घ्यायची आहे. अतिदक्षता विभागाने समुद्रालगतच्या गावांतील नागरिकांना अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर निघावे असे सांगितलेले आहे.
चक्रीवादळातले दावे त्वरीत निकाली काढा
वित्त मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये हेही म्हटले आहे की, बिपरजॉय चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यालगतच्या गावकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या बोटी आणि घरांचे देखील यात नुकसान होऊ शकते. या सगळ्या शक्यता लक्षात घेता विमा कंपन्यांकडे विमासंबंधी दावे येऊ शकतात. कंपन्यांनी हे दावे लवकरात लवकर निकाली काढावेत असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. ग्राहकांची कागदपत्रे आणि खासगी माहिती देखील विमा कंपन्यांनी आणि बँकांनी सांभाळून ठेवायची आहेत असे देखील म्हटले आहे.
सोबतच चक्रीवादळाचा जोर उतरल्यानंतर तत्काळ प्रभावाने बँकांनी एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून द्यावेत आणि बँकांची कामे सुरळीत करावीत असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.