गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरु आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन खरेदीलाही उधाण आले असून ऑफर्स आणि डिस्काउंटच्या लाटेवर यंदा ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सणासुदीचा हंगाम जबरदस्त कमाई करणारा ठरणार आहे. आगामी उत्सव काळात ऑनलाईन बाजारपेठेची 90 हजार कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट या कंपनीने व्यक्त केला आहे.
यंदा ऑनलाईन खरेदीमध्ये 18 ते 20% वाढ होईल, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. भारतात ई-कॉमर्स इंडस्ट्रीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार आणि ई-कॉमर्ससाठी पोषक वातावरणाने या उद्योगाने प्रचंड वाढ नोंदवली आहे.
चालू वर्षात भारतात ई-कॉमर्समधून तब्बल 5 लाख 25000 कोटींची उलाढाल होईल, असे भाकीत रेडसीरने व्यक्त केले आहे. 10 वर्षात भारतातील ई-कॉमर्स दरवर्षी 20% वृद्धी करत आहे. त्यापैकी आगामी गणेशोत्सव, दसरा- दिवाळीसारख्या सणासुदीत 90 हजार कोटींची ऑनलाईन शॉपींग भारतीयांकडून केली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे.
कोरोनो टाळेबंदीनंतर मागील दोन वर्ष बाजारपेठेसाठी मंदीची गेली होती. त्यामुळे यंदा उत्सवी खरेदी वाढण्याची शक्यता आहे. मागील काही तिमाहींमध्ये खरेदीचा ट्रेंड वाढत असल्याचे दिसून आले आहे. सर्वच ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि डिस्काउंटचा वर्षाव केला आहे.
ऑनलाईन शॉपींगचा ट्रेंड पाहता ई-कॉमर्स कंपन्यांनी वितरण साखळी मजबूत केली आहे. पोस्टाप्रमाणेच ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्रामीण भागात वस्तू घरपोच पोहोचवल्या जातात.
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज यावर तब्बल 75 टक्के एवढा जबरदस्त डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा, प्रिंटर, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, इयर बडस यासारख्या वेगवेगळ्या गॅजेट्सवर आकर्षक डिस्काउंट ऑफर आहेत. या ऑफरअंतर्गत OnePlus, Samsung, Redmi आणि Realme यासारखी प्राईम उत्पादने मोठया डिस्काउंट ऑफरमध्ये मिळणार आहेत.