परकीय गुंतणुकीचा ओघ कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या नऊ महिन्यांच्या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 15% कमी झाला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळाक 36.75 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली असल्याचे इंडस्ट्री आणि इंटर्नल ट्रेड डेटा विभागाने म्हटले आहे.
वर्ष 2021 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या काळात देशात 43.17 बिलियन डॉलर्सची थेट परकी गुंतवणूक झाली होती. मात्र यंदा त्यात 15% घसरण झाल्याने सरकारची चिंता वाढवली आहे. इक्विटीमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकादारांकडून होणारी गुंतवणूक, भांडवली गुंतवणुकीतून भारतात परकीय चलन येते. एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या काळात एकूण 55.27 बिलियन डॉलर्सची एफडीआय झाली आहे. वर्ष 2021 मध्ये एप्रिल ते डिसेंबर या काळात 60.4 बिलियन डॉलर्सची एफडीआय झाली होती.
मात्र दरमहा गुंतवणुकीचा विचार केला तर डिसेंबर 2022 मधील एफडीआय दुपटीने वाढली आहे. डिसेंबर 2022 मध्ये 4.4 बिलियन डॉलर्सची एफडीआय झाली. नोव्हेंबर 2022 मध्ये 2.2 बिलियन डॉलर्सची एफडीआय झाली होती. चालू वर्षातील एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत सिंगापूरमधून सर्वाधिक गुंतवणुकीचा ओघ दिसून आला आहे. सिंगापूरमधून 13 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्याखालोखाल मॉरिशसमधून 4.7 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. अमेरिकेतून भारतात 5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली. यूएईमधून 3.1 बिलियन डॉलर्स, नेदरलॅंड्समधून 2.15 बिलियन डॉलर्स, जपानमधून 1.4 बिलियन डॉलर्स आणि सायप्रसमधून 1.15 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.
सिंगापूर आणि नेदरलॅंड्समधून भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. भारतात एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत झालेल्या एकूण परकी गुंतवणुकीच्या निम्मी गुंतवणूक या दोन देशांमधून झाली. यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर या क्षेत्रात जवळपास 8 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्याखालोखाल सेवा क्षेत्रात 6.6 बिलियन डॉलर्स, ट्रेडिंग 4.14 बिलियन डॉलर्स, फार्मा 1.8 बिलियन डॉलर्स, केमिकल्स 1.5 बिलियन डॉलर्स इतकी थेट परकी गुंतवणूक झाली.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतात एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 58.7 बिलियन डॉलर्स इतका होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये विक्रमी 59.6 बिलियन डॉलर्स इतकी 'एफडीआय' झाली होती. वर्ष 2022 मध्ये 83.57 बिलियन डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली होती. जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. नव्याने गुंतवणूक करण्यापूर्वी भू-राजकीय परिस्थीती, सूक्ष्म आर्थिक घटकांचा त्यांच्याकडून अंदाज घेतला जातो.
महाराष्ट्राला परकी गुंतवणूकदारांची पसंती
इंडस्ट्री आणि इंटर्नल ट्रेड डेटा विभागाने जाहीर केलेल्या थेट परकी गुंतवणुकीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक एफडीआय झाली आहे. एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 याकाळात महाराष्ट्रत 10.7 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्याखालोखाल कर्नाटकने बाजी मारली आहे. कर्नाटकात 8.7 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये 4.1 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली तर दिल्लीमध्ये 6.1 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.