Wheat Prices rate Hike: देशात मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटांमुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले. चालू वर्षी अपुरा मान्सून पडण्याची भीती खरी ठरत आहे. अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नाही. दरम्यान, सणासुदीच्या तोंडावर गव्हाच्या किंमती वाढत असताना सरकारकडून किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या मिल्सकडून गव्हाची साठेबाजी तर केली जात नाही ना? याची तपासणी सुरू आहे.
फ्लोअर मिल्सची तपासणी?
ओपन मार्केट सेल स्किमद्वारे (OMSS) विविध राज्य सरकारांद्वांरे मोठ्या मिल आणि होलसेल विक्रेत्यांना गव्हाची सरकारी गोदामातून विक्री केली जाते. गव्हाचे पीठ बनवून या मिल्सद्वारे देशभरात पुरवठा केला जातो. मात्र, जास्त नफा मिळवण्यासाठी मिल मालकांनी गव्हाचा साठा करून ठेवला आहे का? याची तपासणी FCI अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त साठा करण्याची परवानगी मिल्सला नाही.
FCI चे अधिकारी साठ्याची तपासणी करत असल्याचे अनेक मिल मालकांनी सांगितले. स्थानिक बाजारातील गव्हाचे आणि पिठाचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारकडून खुल्या बाजारात सरकारी गोदामातील गहू विक्री केला जातो. (FCI wheat prices) यावर्षी 15 लाख टन गहू विक्री करण्यात आला. मात्र, तरीही गव्हाचे दर चढेच आहे.
स्थानिक बाजारातील गव्हाचे दर वाढले
मागील एक महिन्यात गव्हाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर एकाच आठवड्यात 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दिल्लीत हे दर यापेक्षाही जास्त आहेत.
FCI कडून कमी गव्हाची विक्री
दरम्यान, चालू वर्षी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने खुल्या बाजारात कमी गव्हाची विक्री केल्याचे मिल मालक आणि उद्योजकांनी म्हटले आहे. (FCI Wheat storage) कमी गव्हाची विक्री केल्याने बोलीचे दरही जास्त होते, असे मिल मालकांचे म्हणणे आहे. ज्या मिल गहू खरेदीच्या बोलीत सहभागी होतात त्यांना किती साठा करून ठेवला आहे हे जाहीर करावे लागते.
सध्या दर आठवड्यात 100 टन गहू प्रति बोलीमागे FCI कडून विकला जातो. हे प्रमाण दर आठवड्यात 300-500 टनांपर्यंत वाढवण्याची मागणी खरेदीदारांनी केली आहे.
सणासुदीच्या काळात गव्हाची मागणी वाढणार?
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी असे मोठे सण पुढील काही महिन्यांत आहेत. या काळात महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, गव्हाची मासिक मागणी पुढील काही महिन्यात 50 ते 100% जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.