Fathers Day: भारतात मदर्स डे जेवढ्या उत्साहात आणि संवेदनशीलपणे साजरा केला जातो. त्या तुलनेत फादर्स डे जरा उपेक्षितच आहे. उद्या (18 जून) फादर्स डे देशभरात सेलिब्रेट केला जाईल. आपल्या कुटुंबव्यवस्थेत पुरुषांकडेच सहसा अर्थार्जनाची जबादारी असते. पत्नी, आईवडील, मुलांचे आरोग्य, घरगुती खर्च, शिक्षण किराणा, आवडीनिवडींना पैसा पुरुषाकडून पुरवला जातो. आता परिस्थितीत बदलत आहे. महिलाही नोकरी व्यवसायात मोठ्या प्रमाणात उतरत आहेत. मात्र, 2021 च्या सरकारी आकडेवारीनुसार महिलांचा लेबर फोर्समधील वाटा फक्त 19% आहे.
भारतात अनेक महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. त्यांचे श्रम पैशांच्या मोजले जात नसले तरी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पुरुषाला “ब्रेड विनर” असं म्हटलं जाते. म्हणजेच पैसे कमावून कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखाची. मूल जन्माला घालणं हा एक मोठा निर्णय आहे. त्याचे आर्थिक, सामाजिक, मानसिक परिणाम कुटुंबात दिसून येतात. या लेखात आपण आर्थिक बाजू पाहू.
महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. (Cost of raising child) सरासरी 6% दराने दरवर्षी महागाई वाढत आहे. म्हणजे जर 2023 वर्षात मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर बालक 23 वर्षांचे होईपर्यंत खर्चाचा विचार आतापासून करायला हवा. त्यानंतर शिक्षण पूर्ण होऊन मूल कमवायला लागू शकते. आरोग्य, विमा, शिक्षण, कौशल्य विकास या काही महत्त्वाच्या खर्चांसोबतच इतर छोटेमोठे अनेक खर्च आहेत जे तुम्हाला विचारात घ्यावे लागतील.
मुंबई, दिल्ली, बंगळुरू या टायर -1 मेट्रो शहरातील खर्च जास्त असेल तर टायर -2 शहरातील खर्च तुलनेने कमी राहील. अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारात खर्चाची विभागणी करू.
मूल वाढवण्याचा खर्च
अल्पकालीन खर्च कोणते असू शकतात?
गर्भधारणेपासूनचा खर्च विचारात घेतला तर डॉक्टरांच्या व्हिजिट, गोळ्याऔषधे, विविध चाचण्या याचा 9 महिन्यांचा खर्च, प्रसूती खर्च, रुग्णालयातून घरी आणल्यानंतरचा खर्च, नवजात बालक खूपच संवदेनशील असल्याने इतरही खर्च उद्भवू शकतात.
मध्यम ते दीर्घकाळातील खर्च?
तीन वर्षांचे मूल झाल्यानंतर डे केअर, प्री स्कूल, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हीटी, आरोग्य, बालकासाठीच्या उपभोग्य वस्तू आणि इतरही काही खर्च असू शकतात.
मूल जन्मल्यानंतर दीर्घकालीन खर्च भागवण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळू शकतो. (Child education expenses) मात्र, अल्पकालीन खर्चासाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला तत्काळ करावी लागू शकते. अशा वेळी पैसा हातात नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. अनेक वेळा अल्पकालीन खर्चात मोठी वाढ होते. सर्व विमा पॉलिसी प्रसूतीचा संपूर्ण खर्च कव्हर करत नाहीत. तसेच वेटिंग पिरियडही असतो. ही मिळालेली रक्कम पुरेशी नसू शकते.
बालकाच्या भविष्यासाठी आत्ताच गुंतवणूक सुरू करा?
तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी त्याच्या जन्मापासून गुंतवणूक सुरू करण्याचा निर्णय योग्य राहील. मुलाच्या वयानुसार किती खर्च होऊ शकतो त्यानुसार गुंतवणुकीचे ध्येय निश्चित करा. मुलासंबंधित अल्पकाळासाठीचे खर्च भागवण्यासाठी निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करा. (Child education expenses) बँक एफडी, पोस्ट ऑफिस,, बाँड्स, आवर्ती ठेवी असे पर्याय तुमच्यापुढे आहेत. तसेच पत्नीच्या नावे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेटसारख्या योजनांमध्येही गुंतवणूक करू शकता.
मध्यम ते दीर्घकालीन मुलाच्या खर्चासाठी स्टॉक, इक्विटी म्युच्युअल फंड, इटीएफ मध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र, तुमचे उत्पन्न, जोखीम घेण्याची क्षमता पाहून गुंतवणूक करा. जास्त जोखीम घेतली तर मुलाचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अधिकृत आर्थिक सल्लागाराकडून माहिती घेऊन निर्णय घ्यावा.