Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Farmer Success Story: वडिलोपार्जित 2.5 एकर जमिनीत रात्रंदिवस मेहनत करून शेतकऱ्याने उभारले 15 एकराचे साम्राज्य!

Farmers

Farmer Success Story: अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 2.5 एकर शेतीमध्ये रात्रंदिवस मेहनत करून वडिलोपार्जित 2.5 एकराच्या शेतीचे 15 एकर शेतीत रुपांतर केले. हे यश त्यांनी कसे मिळवले, त्याची यशोगाथा जाणून घेऊया.

Farmer Success Story: वडीलोपार्जित संपत्ती मिळाली की, ती विकणे, तिची नासधूस करणे, गहाण ठेवणे असे प्रकार तर आपण नेहमीच ऐकतो. पण,अशीही काही मुले असतात जी मिळालेल्या संपत्तीला आईवडिलांचा आशीर्वाद समजून आपला वारसा जपतात. जे मिळाले त्यात मेहनत करून स्वत:चे वेगळे साम्राज्य उभे करतात. अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 2.5 एकर शेतीमध्ये रात्रंदिवस मेहनत घेऊन आपली शेती 2.5 एकरावरून 15 एकर केली. यात त्याची पत्नी व मुलांची साथ त्याला वेळोवेळी लाभली आहे.

शेतीच्याच उत्पन्नातून घेतली 5 एकर शेती 

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा या गावातील नामदेवराव अढाऊ हे प्रगतशील शेतकरी आहेत. गेल्या 40 वर्षापासून ते शेती व्यवसाय करत आहेत.  त्यांना वडिलोपार्जित शेती 2.5 एकर मिळाली होती. त्या शेतीत काम करून मिळालेल्या उत्पन्नात ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे. अशातच गावातील एका व्यक्तीकडे त्यांना काम मिळाले. तेव्हा त्यांचे वय 25 वर्ष होते. ज्यांच्याकडे काम करायला होते त्यांना घरची परिस्थिती जेमतेम आहे हे माहित होते. त्यांच्याशी ओळख वाढत गेली, त्या व्यक्तीने नामदेव यांना जिल्हा पाटबंधारे विभागात नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितले आणि मेहनत घेऊन त्यांना 700 रुपये महिना पगाराची नोकरी मिळाली. ती नोकरी करीत असतांना नामदेव यांनी शेत सुद्धा सांभाळले. शेतातून चांगले उत्पन्न मिळू लागले.

नामदेव यांनी शेती आणि नोकरी या दोन्हींचा व्यवस्थित तालमेल करून घरची परिस्थिती सुधारली. मिळालेल्या पगारातून घर खर्च करायचा, उरलेल्या सर्व पैशांची बचत करायची. अंगाला दोन जोडीच्या वर कपडेही नामदेव यांनी कित्येक दिवस घेतले नाही. रात्रंदिवस शेतात मेहनत घेतली. त्यानंतर ज्योती यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांचे नाशिबच उजाळले. आपल्या पत्नीला सोबत घेऊन नामदेव यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले. त्यातही त्यांना यश आले, चांगले पैसे मिळू लागले.  पत्नीच्या सहकार्याने नामदेव यांनी बचतीच्या पैशातून 5 एकर शेती विकत घेतली. दोन्ही पती पत्नीच्या सहकार्याने संसाराचा गाडा उत्तम चालू लागला. शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू लागले. 

head-image-1-4.jpg
नवीन प्रयोगातून लावलेली मिरची 

15 एकर शेती फक्त माझ्या बाबांच्या मेहनतीचे फळ आहे

नामदेव यांना दोन अपत्ये आहेत. मुलगा प्रितम यानेही वयाच्या 17 व्या वर्षापासून वडिलांच्या पायावर पाऊल टाकले. शेतीविषयक डिप्लोमा (Diploma in Agriculture) करून त्याने शेतात नवनवीन प्रयोग सुरू केले. 'महामनी'शी बोलतांना प्रितम यांनी सांगितले की,  सेंद्रीय शेतीसाठी मी प्रयोग करून बघितला. अर्धा एकर शेतीमध्ये घरगुती वापरासाठी भाजीपाला लागवड केली होती. पण, शेतीला 100% रासायनिकची सवय असल्याने एकाएकी ती 100% सेंद्रिय (organic) होणे शक्य नाही. म्हणून त्यात सुरवातीला 90% रासायनिक 10% सेंद्रिय असे प्रमाण घ्यावे लागते, त्यानंतर दरवर्षी 10% सेंद्रिय वाढवत जाऊन शेती 100% सेंद्रिय करता येऊ शकते. या प्रयोगातून उत्पन्नात वाढ झाली. शेतीमध्ये आम्हाला यश मिळू लागले. 

त्याचबरोबर मी डी कम्पोजचा प्रयोगसुद्धा केला होता. गांडुळ खतातून जमिनीला पोषक तत्वे मिळतात. गांडुळाचे वजन सुमारे 10 ग्रॅम असते. तो त्याच्या शरीराच्या वजनाच्या 5 पट खातो आणि त्याच प्रमाणात उत्सर्जित करतो. चार लाख गांडुळे तीन महिन्यांत सहा लाख टन माती फिरवतात.  उपचार केलेल्या मातीच्या तुलनेत या मातीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या दुप्पट, नायट्रोजनच्या सात पट, फॉस्फरसच्या अकरापट आणि पोटॅशियमच्या पाच पट जास्त आहे. याशिवाय या जमिनीतील लिग्नाइटमुळे पिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते. ते बॅक्टेरिया तयार करण्यास देखील मदत करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पन्न वाढण्यास मदत होते. या प्रयोगाला सुद्धा यश आले. 

नवनवीन प्रयोग करत असतांना आणि 7.5 एकर शेती सांभाळत असतांना त्यात भर म्हणून अजून 7.5 एकर शेत विकत घेतले. फक्त शेतीतील उत्पन्नावर 15 एकर शेतीचे साम्राज्य उभे केले. या सर्व घडामोडींमध्ये नामदेव यांची पत्नी ज्योती आणि मुलगा प्रितम याने भरपूर साथ दिली. नामदेव यांचा मुलगा प्रितम याने सांगितले की, आमची 15 एकर शेती फक्त माझ्या बाबांच्या मेहनतीचे फळ आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती फार कमी होती पण, बाबांनी मेहनत घेऊन इतके मोठे साम्राज्य उभे केले. 15 एकरमध्ये आम्ही कापूस, तूर, आले, हळद, सोयाबीन, हरभरा, गहू ही सर्व पिके घेतो. सेंद्रिय शेतीसाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत.

head-image-2-1.jpg
सेंद्रिय पदार्थांचा वापर करून घेतलेली हळद 

शेतीतून मिळणारे उत्पन्न किती? 

15 एकर शेतीमध्ये वर्षभर मेहनत करून त्यातून आम्हाला 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातून 4 ते 5 लाख रुपये लागवड खर्च गेला तर 6 लाख रुपये नफा आम्हाला दरवर्षी शेतीतून मिळतो. महागाई वाढली त्याचबरोबर खर्च सुद्धा वाढला. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत जाते. त्याचप्रमाणे लागवड खर्च सुद्धा वाढतो. एखादा नवीन प्रयोग करायचं म्हटलं तर त्याला सुद्धा खर्च लागतोच. शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले त्यामुळे आता आम्ही आमच्या शेतापासून दूर विहिरीसाठी जागा घेतली. आमच्या शेतातून ते विहिरीपर्यन्त अंतर 200 ते 250 पाइप आहेत. शेतीसाठी आवश्यक बाबींपैकी सर्वात महत्वाचे म्हणजे पाणी. त्यासाठी 7 ते 8 लाख रुपये खर्च करून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. 

प्रगतशील शेतकरी नामदेव अढाऊ हे महामनिशी बोलतांना म्हणतात, जिद्द हीच माणसाची दौलत आहे. मला मिळालेल्या थोड्या जमिनीवर मी आज 15 एकर शेत घेतले, ही प्रोसेस एका दिवसांत झाली किंवा एका वर्षात झाली असेही नाही. अनेक संकटांचा सामना करावा लागला. नैसर्गिक आपत्ती सुद्धा भरपूर आल्यात, पण मी जिद्द आणि मेहनत निरंतर केली. या यशाचे भागीदार माझ्या मुलगा आणि माझी पत्नी दोघेही आहेत. शेतीमध्ये जितकी मेहनत घ्याल त्याच्या दुप्पट टी तुम्हाला परत करते. त्यामुळे शेतीला प्राधान्य द्या, शेती आहे म्हणून आपण आहोत.