सायबर चोर सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी काय काय क्लुप्त्या अंमलात आणतील याचा काही भरवसा नाही. आता तर सायबर चोरांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या नावानेच नागरिकांची फसवणूक करण्याचा कट रचला आहे.
होय, याबद्दल खुद्द सुप्रीम कोर्टानेच माध्यमांना माहिती दिली असून, सायबर चोरांनी सुप्रीम कोर्टाच्या नावाने बनावट वेबसाइट बनवली असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी एक परिपत्रक काढत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली एक बनावट वेबसाइट तयार केली गेली असून, सायबर क्राईम प्रकरणी नागरिकांकडून त्यांचे खासगी तपशील आणि बँकेचे तपशील मागितले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय म्हटले सुप्रीम कोर्टाने?
नागरिकांनी सुप्रीम कोर्टाच्या नावे सुरु करण्यात आलेल्या वेबसाइटवर कुठलीही माहिती देऊ नये असे म्हटले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाचा कुठलाही विभाग नागरिकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती मागवत नाही असेही म्हटले आहे. त्यामुळे कुणाशीही आर्थिक व्यवहार करताना आपली आर्थिक आणि गोपनीय माहिती देऊ नये असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
Supreme Court issues a circular stating that its Registry has been made aware of a phishing attack on its website. A fake website, impersonating the official website has been created and hosted. The attackers through the URL are soliciting personal details and confidential… pic.twitter.com/lVKXMBa1g7
— ANI (@ANI) August 31, 2023
सोशल मिडीयावर धुमाकूळ
सोशल मिडीयावर सध्या एक मेसेज सध्या व्हायरल होत असून त्यात सुप्रीम कोर्टासंबंधित एक लिंक देण्यात आली आहे. ही लिंक ओपन करताच ती सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटशी साधर्म्य असलेली जाणवते. जर तुमच्यासोबत काही सायबर फसवणुकीचे काही प्रकार घडले असल्यास तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात याची तक्रार नोंदवू शकता असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
या मेसेजवर विश्वास ठेऊन लवकरात लवकर न्याय मिळेल म्हणून नागरिक या बनावट वेबसाइटवर विचारण्यात आलेली सर्व माहिती देत आहेत. आधीच आर्थिक फसवणूक झालेले नागरिक पुन्हा एका फसवणुकीला बळी पडत आहेत.
वेबसाइटची सत्यता पडताळणी केल्याशिवाय त्यावर कुठलीही माहिती भरू नये आणि कुणालाही आपले वैयक्तिक डीटेल्स आणि बँकेचा खाते क्रमांक, ओटीपी वैगेरे संवेदनशील माहिती देऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अधिकृत वेबसाइट
सुप्रीम कोर्टाची स्वतःची एक अधिकृत वेबसाइट असून त्यावर न्याय-निवाडा, कायद्यातील बदल याबद्दल वेळोवेळी माहिती देण्यात येत असते. www.sci.gov.in या नावाने सुप्रीम कोर्टाची अधिकृत वेबसाइट कार्यरत आहे.