आरोग्य विमा ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रत्यकाने आरोग्य विमा काढायला हवा. कुटुंबावर आलेल्या आरोग्य आणीबाणीच्या काळात तुम्हाला खिशातून पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. आरोग्य विमा घेताना अनेकजण कॅन्सर म्हणजेच कर्करोगापासून सुरक्षा हा पर्यायही निवडत असतात. सहाजिकच त्यासाठी तुम्हाला प्रिमियम जास्त भरावा लागेल. विम्यातील कोणतेही अधिकचे फिचर निवडताना कंपनीने अटी आणि नियम घातलेले असतात. हे सगळे नियम तुम्ही काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. अन्यथा ऐनवेळी कंपनी तुम्हाला नियमात बसत नसल्याचे सांगून तुमचा दावा नाकारू शकते. त्यामुळे कॅन्सर फिचर निवडताना खालील बाबी तपासून घ्या.
Table of contents [Show]
बेनिफिट विरुद्ध नुकसानभरपाई:
कॅन्सरपासून सुरक्षेसाठी बाजारात दोन प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध आहेत. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आणि ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतर विम्याची रक्कम दिली जाते, त्यास बेनिफिट पॉलिसी असे म्हणतात. तर नुकसानभरपाई (indemnity) पॉलिसीमध्ये, प्रतिक्षा कालावधी संपल्यानंतर विम्याची रक्कम दिली जाते. कर्करोगाच्या उपचारासाठी केलेल्या खर्चानुसार परतफेड केली जाते.
किती रकमेचा कव्हर असावा?
कर्करोगावरील उपचार हे महागडे आणि जास्त काळापर्यंत चालतात. कर्करोगाच्या निदान चाचण्या, केमोथेरपी, ऑपरेशन, औषधे यासाठी तुम्हाला लाखो रुपये लागतील. जर विम्यामध्ये कर्करोग कव्हर नसेल तर तुम्हाला हे सगळे पैसे तुमच्या बचतीमधून भरावे लागतील. त्यामुळे वाढते वय आणि जीवनशैलीचा विचार करून कॅन्सर फिचर आरोग्य विम्यामध्ये समाविष्ट करावे. तसेच विम्याचा कव्हरही जास्त लाखांचा ठेवावा.
पूर्वी कॅन्सर किंवा इतर आजार झाला असेल तर त्याचा तपशील
जर विमा घेणाऱ्या व्यक्तीला पूर्वी कॅन्सरचे निदान झाले असेल किंवा त्याने उपचार घेतले असतील तर पॉलिसी घेताना या सुविधेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण, यामध्ये धोका अधिक असतो. अनेक कंपन्या अशा धोका पत्करुन कॅन्सर सुरक्षा कवच देत नाहीत. जर तुम्ही आजाराची आधीची माहिती लपवली तरीही तुमचा दावा नाकारला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सहसा कोणतीही माहिती लपवू नये. इतर कोणताही आजार झाला असेल सहव्याधी असेल तर त्याचीही माहिती लपवू नये. त्यामुळेही भविष्यात तुमचा दावा रद्द होऊ शकते. प्रिमियम वाचवायच्या भानगडीत तुम्ही संपूर्ण पॉलिसीचे फायदे गमावून बसाल.
प्रतिक्षा कालावधी
प्रत्येक विमा कंपनी एखादा आजारा विम्यात कव्हर होण्याआधी ठराविक काळाचा प्रतिक्षा कालावधी ठेवते. या प्रतिक्षा कालावधीमध्ये जर तुम्हाला आजाराचे निदान झाले तर तुम्हाला दावा करता येणार नाही. त्यामुळे ज्या विमा कंपनीचा प्रतिक्षा कालावधी कमी आहे त्या विमा कंपनीची पॉलिसी घेण्याचा विचार तुम्ही करायला हवा.
को पेमेंट( सह-देयक)
को पेमेंटचा सोपा अर्थ म्हणजे तुमचे रुग्णालयाचे जे काही बिल होईल त्यातील काही ठराविक रक्कम पॉलिसी धारकाला भरावी लागेल. म्हणजे जर तुम्ही उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट असाल. एकूण उपचाराचा खर्च २ लाख रुपये झाला. तर कंपनी ३० ट्क्के को पेमेंटची अट ठेवू शकते. हे पॉलिसी कागदपत्रांमध्ये स्पष्ट लिहलेले असते. या परिस्थितीत कंपनी फक्त १ लाख ४० हजार रुपयांचा दावा मंजूर करेल आणि ६० हजार रुपये तुम्हाला भरावे लागतील. त्यामुळे कॅन्सर पॉलिसी घेताना अशी काही अट आहे का ते तपासून घ्या. कारण कॅन्सर उपचाराचा खर्च खूप मोठा असतो. त्यामुळे को पेमेंटही लाखांत जाईल.