Health Insurance Premium: सुरक्षेचा जेव्हा विषय येतो तेव्हा आरोग्य विमा ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तुमच्या स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी विमा कवच हवेच. महामनीच्या विविध लेखांद्वारे आम्ही आरोग्य विम्याबाबत नागरिकांना जागरुक करत असतो. या लेखात पाहूया आरोग्य विम्याचा प्रिमियम वाढण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात. विम्याची रक्कम, पॉलिसी धारकाचे वय, शारीरिक व्याधी हे घटक कारणीभूत आहेतच. यासोबतच इतरही काही घटक आहेत ज्यांची जास्त चर्चा होत नाही.
तुम्ही करत असलेला व्यवसाय (Your occupation)
आरोग्य विम्याचा प्रिमियम ठरताना तुमचा व्यवसाय काय आहे यावरही बरेच अवलंबून असते. तुम्ही जर धोकादायक, अती जोखमीचे काम करत असाल तर तुम्हाला विमा कंपनी जास्त प्रिमियम आकारते. जसे की, खाण कामगार, अवजड उद्योग, ज्वलनशील पदार्थ निर्मिती, घातक केमिकल्स, बांधकाम कर्मचारी, आग, वीज यांच्यासंबंधित कामे करणाऱ्या व्यक्तींना कंपनी जास्त प्रिमियम आकारते. आरोग्य विम्यासोबत जीवन विम्याचा प्रिमियमही जास्त भरावा लागतो.
तुमचे छंद कोणते आहेत? (Your hobbies)
स्कायडायव्हिंग, रॉक क्लायमिंग, कार, मोटार रेसिंग, ट्रेकिंग अशा जोखमीच्या अॅक्टिव्हिटी जर तुमचा छंद असेल तर तुम्हाला आरोग्य विम्यासाठी जास्त प्रिमियम भरावा लागू शकतो. विमा कंपन्या अशा छंदांना जोखमी समजतात. असे छंद जोपासताना अपघात होऊन जखमी होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कंपन्या प्रिमियमही जास्त घेतात. तसेच जोखमीचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स जीवन विमा कंपन्या कव्हर करत नाहीत.
मेडिकल हिस्ट्री
तुमच्या आरोग्यासंबंधित जुनी माहिती तुम्हाला कदाचित जास्त प्रिमियम भरण्याचे कारण होऊ शकते. तुम्हाला यापूर्वी झालेले आजार किंवा कुटुंबातील व्यक्तींना असलेले आजार यावरही विमा प्रिमियम ठरतो. डायबेटिज, हृदयविकार यासह इतर आजारांची माहिती आरोग्य विमा प्रतिनिधी तुम्हाला विमा पॉलिसी घेतेवेळी विचारतात. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला व्याधी असतील तर तुम्हाला जास्त प्रिमियम द्यावा लागतो. तसेच तुम्हीही पूर्वीपासून एखाद्या व्याधीने ग्रस्त असाल तर त्यासाठी कंपनी जास्त प्रिमियम आकारते.
तुमची जीवनशैली आणि सवयी (Your lifestyle habits)
आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या सवयी आणि जीवनशैलींमुळे तुम्हाला जास्त प्रिमियम भरावा लागू शकतो. स्मोकिंग, मद्यसेवन, बैठे कामाची पद्धत यामुळे शारीरिक व्याधी जडतात. सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तींना कर्करोग, श्वसनाचे आजार होण्याचा जास्त धोका असतो. तसेच बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना डायबेटीज, ओबेसिटी असे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आरोग्य कंपनी तुमची जीवनशैली आणि सवयी पाहून प्रिमियम आकारते. जर तुम्ही तुमच्या सवयींबाबत खोटी माहिती दिली तर तुमचा विम्याचा दावा नाकारला जाण्याची शक्यताही असते. त्यामुळे कधीही विमा पॉलिसी घेताना खोटी माहिती देऊ नका.
त्यामुळे दररोज व्यायाम, आरोग्यदायी आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच वेळोवेळी संपूर्ण आरोग्य चाचणी केल्याने प्रतिबंधात्मक उपचार घेता येतात. कर्करोगाचे निदान तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात झाल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असतील.