Fact Check Alert: प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आल्यामुळे सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ लागली आहे. यामुळे लोकांचे डिजिटायझेशन नक्कीच वाढले. पण दुसरीकडे लोकांमध्ये चुकीच्या आणि खोट्या बातम्यादेखील तितक्याच वेगाने पसरू लागल्या आहेत. याबाबत नागरिकांना अलर्ट राहून स्वत:ची फसवणूक होणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे.
सध्या व्हॉट्स अॅपवरून फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या संस्कृतीमुळे अनेक जणांकडून चुकीची माहिती क्षणार्धात हजारो लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. अनेकांकडून त्या माहितीची सत्यता पडताळली जात नाही. ती माहिती वाचून आहे तशी पुढे पाठवली जाते. तिचा प्रसार इतका होतो की, ती माहिती खरी आहे. असा लोकांचा समज होऊ लागतो. यामुळे अनेकांची फसवणूकही होते.
आर्थिक फसवणुकीसाठी खोट्या माहितीचा प्रसार
बऱ्याचवेळा लोकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशानेच खोटी माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. यामध्ये अनेकवेळा या लिंकवर क्लिक करा आणि बोनस मिळवा किंवा 100 टक्के ऑफर्सचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवली जाते. तसेच स्कॉलरशिप देण्याच्या बहाण्याने सुद्धा लोकांची फसवणूक केली जाते.
फॅक्ट चेक अलर्टचा वापर करा
सध्या सोशल मिडियावरून वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या खोट्या बातम्यांचा छडा लावण्याचे काम सरकार आणि लोकशाहीचा चौथा खांब म्हणून न्यूज मिडियावर आले आहे. आज अनेक असे मिडिया हाऊस आहेत; जे खोट्या बातम्यांचा तपास करून त्याची सत्यता लोकांसमोर आणत आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB, Govt of India) तर्फेही फॅक्ट चेक केल्या जातात. या फॅक्ट चेक अलर्टचा वापर करून तुम्ही तुमची होणारी फसवणूक टाळू शकता. केंद्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे PIB Fact Check ट्विटर खाते, टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून सरकारच्या नावाने सुरू करण्यात आलेली वेबपोर्टल, अॅप्स, स्कीम्स याबाबत नागरिकांना अलर्ट केले जाते.