Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Govt Hikes Windfall Tax: देशातून डिझेलची निर्यात महागणार, सरकारने कर वाढवला

Govt Hikes Windfall Tax: देशातून डिझेलची निर्यात महागणार, सरकारने कर वाढवला

Tax on Crude Oil: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता भारत सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) वाढवला आहे. यासोबतच भारतातील रिफायनरीमध्ये तयार होणाऱ्या डिझेल आणि एटीएफची निर्यातही महाग झाली आहे.

भारत जरी मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असला तरी देशाच्या रिफायनरी क्षमतेमुळे जगातील अनेक देशांना भारताकडून पेट्रोल-डिझेल आणि एटीएफचा (Aviation Turbine Fuel) पुरवठा होतो. सरकारने डिझेल आणि विमान इंधनावरील (ATF) निर्यात शुल्कात वाढ केली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता, देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावर विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) वाढवण्यात आला आहे.

देशातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) सारख्या कंपन्यांद्वारे उत्पादित कच्च्या तेलावर हा विंडफॉल कर आकारला जाईल असे जाहीर केले आहे.

1900 वरून 5050 रुपये झाला टॅक्स

देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावर आता 1,900 रुपये प्रति टन ऐवजी 5,050 रुपये प्रति टन विंडफॉल टॅक्स लागणार आहे. सरकारने 3 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आदेशात या कराचे दर 4 फेब्रुवारीपासून तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे म्हटले आहे. खनिज तेल जमिनीखालून आणि समुद्रातून काढले जाते. त्याचे नंतर पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनात रूपांतर होते.

डिझेल आणि एटीएफवर निर्यात शुल्क वाढले

सरकारने केवळ कच्च्या तेलावरील विंडफॉल कर वाढवलेला नाही. तर देशातून निर्यात होणाऱ्या डिझेल आणि विमान इंधनावरही निर्यात शुल्क वाढवण्यात आले आहे. आता भारतातून निर्यात होणाऱ्या डिझेलवर 5 रुपयांऐवजी 7.5 रुपये प्रति लिटर कर करण्यात येणार आहे. विमान इंधनाचे निर्यात शुल्क आता 3.5 रुपये प्रति लीटर ऐवजी 6 रुपये प्रति लिटर इतके असेल.अशा प्रकारे, देशांतर्गत कच्चे तेल आणि इंधनाच्या निर्यातीवरील कर दर आता वाढवण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात कराचे दर नीचांकी पातळीवर पोहोचले होते.

यापूर्वी, सरकारने 17 जानेवारी रोजी दर 15 दिवसांनी केलेल्या पुनरावलोकनादरम्यान या करांच्या दरात कपात केली होती. त्यावेळी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या होत्या. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. गेल्या वर्षी 1 जुलै रोजी भारताने पहिल्यांदा विंडफॉल टॅक्स लागू केला होता. तेव्हापासून भारत ऊर्जा कंपन्यांच्या विंडफॉल नफ्यावर कर लादणारा एक देश बनला आहे.