इंधनाचे वाढते दर आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचा ट्रेंड दिसून आला आहे. वर्ष 2022 मध्ये जगभरात 1 कोटी 20 लाख इलेक्ट्रि्क कार्सची विक्री झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरच्या चौथ्या तिमाहीत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 53% वाढ झाल्याचे दिसून आले. टेस्ला कंपनीची वाय या ईव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे.
काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये 1 कोटी 20 लाख इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली आहे. यात टेस्ला कंपनीची Y कार विक्रीच्या बाबतील टॉप ठरली. त्याखालोखाल चीनमधील BYD कारला ग्राहकांनी खरेदी केले आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत बॅटरवरील कारच्या विक्रीत 72% वाढ झाल्याचे दिसून आले. उर्वरित हायब्रीड मोटारी होत्या.
बॅटरी आणि इलेक्ट्रिक कारचा ट्रेंड असाच कायम राहिला तर वर्ष 2023 मध्ये जगभरातील ईव्ही कारची संख्या 1 कोटी 70 लाखांपर्यंत वाढेल, असा विश्वास काउंटर रिसर्चचे वरिष्ठ संशोधक साउमेन मंडल यांनी व्यक्त केला. चीनमधील कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फारसा परिणाम इलेक्ट्रिक कारच्या विक्रीवर झाला नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकंवर काढल्यानंतर ईव्ही उत्पादन आणि सुट्या भागांच्या पुरवठ्याला फटका बसला होता. मात्र त्यानंतर पुरवठा साखळी सुरळीत झाली आणि गाड्यांच्या विक्रीत एक भक्कम वृद्धी दिसून आली.
चीनमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादकांची संख्या प्रचंड आहे. या कारसाठी लागणारे सुटे भाग बनवणारे उत्पादक देखील अनेक आहेत. या कंपन्यांकडून आग्नेय आशिया आणि दक्षिण अमेरिका आणि युरोपातील कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा केला जातो. दरम्यान, चीन सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना प्रोत्साहन म्हणून सबसिडी दिली जाते.
युरोप-अमेरिका ईव्ही कार्सची मोठी बाजारपेठ
वर्ष 2022 मधील एकूण विक्री झालेल्या एकूण ईव्ही विक्रीमध्ये मोटारींचा सर्वात जास्त खप युरोप, अमेरिका आणि चीन येथे झाला आहे. युरोपातील जर्मनीत ईव्ही कार्सला प्रचंड मागणी आहे. जगातील 10 टॉप ईव्ही उत्पादकांचा एकूण विक्रीमध्ये 72% हिस्सा आहे. या उत्पादक कंपन्यांकडे इलेक्ट्रिक कार्सचे 39 मॉडेल्स आहेत.
भारतात ईव्हींची विक्री 200% ने वाढली
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार वर्ष 2022 मध्ये भारतात एकूण 9 लाख 99 हजार 949 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. यात वर्ष 2021 च्या तुलनेत 210% वाढ झाली. वर्ष 2021 मध्ये 3 लाख 22 हजार 871 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. त्यात 165% वाढ झाली होती.
इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिक बाइक्स आघाडीवर आहे. गेल्या वर्षात 6 लाख 22 हजार 337 इलेक्ट्रिक बाइक्सची विक्री झाली आहे. यात 62.23% वाढ झाली. भारतातील एकूण दुचाकींच्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक बाइक्सचे प्रमाण 4% इतके आहे. ओला इलेक्ट्रिकने सर्वाधिक बाइक्स विक्री केल्या असून त्याखालोखाल ओकिनावा ऑटोटेक आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये तीन चाकी वाहने आणि कमर्शिअल वाहनांची संख्या लक्षणीय आहे.