इलेक्ट्रिक वाहनांची मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकेत या वाहनांच्या चार्जिंगसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ‘नॅशनल इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जर नेटवर्क’संदर्भातील नवीन नियमावली नुकताच सरकारने लागू केली. मात्र यातील एका अटीमुळे ईव्ही उत्पादक कंपन्यांचे टेन्शन वाढवले आहे. जो बायडन यांच्या सरकारने अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या चार्जरचाच वापर बंधनकारक केला आहे. ज्यामुळे टेस्लासारख्या कंपन्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसंबधी स्वतंत्र धोरण असावे यासाठी मागील आठ महिन्यांपासून सरकारकडून प्रयत्न सुरु होते. अखेर बुधवारी हे धोरण लागू करण्यात आल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. ज्यात वाहनांचे चार्जिंग करणारा चार्जर हा अमेरिकेतच तयार झालेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे.
अमेरिकेत वाहनांच्या चार्जिंगसाठी कम्बाइन चार्जिंग सिस्टम (CCS)चा वापर केला जातो. या यंत्रणेत सर्वच प्रकारच्या चार्जरसाठी एकच सामायिक पद्धतीचा वापर केला जातो. तो 97% अचूक आहे. चार्जर 'मेड इन यूएसए' चार्जरच्या निर्मितीसाठी कंपन्यांना अमेरिकन सरकारकडून 7.5 बिलियन डॉलर्सचे अर्थसहाय्य केले जाण्याची शक्यता आहे.
सध्या टेस्ला ही अमेरिकेतील सर्वात मोठी ईव्ही कार आणि चार्जर उत्पादक कंपनी आहे. सामायिक चार्जर आणि यंत्रणेबाबतच्या बायडन प्रशासनाच्या नव्या धोरणाला आता टेस्लाला सुद्धा स्वीकारावे लागणार आहे. इलेक्ट्रिक कार कोणत्याही कंपनीची असली तरी ग्राहकाला ती चार्ज करण्याची सुविधा असावी. ही यंत्रणा सामायिक आणि सहज वापरता योग्य असावी, असे मत अमेरिकेचे ट्रान्सपोर्टेशन सेक्रेटरी पेट बटिग यांनी सांगितले. त्यांनी नवी चार्जिंग धोरणाबाबत माहिती दिली.
सरकारकडून चार्जिंग यंत्रणा उभारणाऱ्या कंपन्यांना लवकरच अर्थसहाय्य केले जाणार आहे. येत्या काही आठवड्यात काही राज्यांतील कंपन्यांना पहिल्या टप्प्याचा निधी वितरित केला जाईल. टेस्ला, ईव्हीगो आणि चार्जपॉइंट होल्डिंग्ज इन. या कंपन्यांना हा निधी मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने चार्जिंग धोरण लागू करण्यापूर्वी कंपन्यांना स्थानिक पातळीवरुन सुट्या भागांची पूर्तता करावी अशी तंबी दिली आहे. स्थानिक उत्पादकांसाठी मेड इन अमेरिका योजनेची डेडलाईन वाढवण्यात आली आहे. नवीन चार्जिंग धोरण हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या योजनेचा एक भाग आहे. वर्ष 2030 पर्यंत अमेरिकेत विक्री होणाऱ्या नवीन वाहनांमध्ये 50% वाहने इलेक्ट्रिक असतील, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बायडेन यांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला प्रोत्साहन मिळाले आहे. अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दुपटीने वाढली आहे. त्याशिवाय चार्जिंग स्टेशन्सचे नेटवर्क देखील प्रचंड वाढले आहे.
बिल्ड अमेरिका बाय अमेरिका धोरण ('BUILD AMERICA, BUY AMERICA')
- पायाभूत सेवा क्षेत्रासाठी लागू केलेल्या 2021 च्या नव्या इन्फ्रा लॉनुसार सरकारी प्रोजेक्ट्साठी आवश्यक किमान 55% कच्चा माल, बांधकाम साहित्य स्थानिक पातळीवर खरेदी करणे कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
- लोखंड, पोलाद आणि इतर बांधकाम साहित्य खरेदीसाठी स्थानिक पातळीवर खरेदीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.
- अशा प्रकारे चार्जिंग स्टेशन्स उभारणाऱ्या कंपन्यांना येत्या 1 जानेवारी 2024 पासून 55% खर्च सरकारकडून माफ केला जाणार आहे.
- या धोरणामुळे अमेरिकाचे मेक्सिको आणि युरोपमधील व्यापारी संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
- अमेरिकेत परदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर अमेरिका आणि युरोपीयन युनियन यांच्या एक टास्क फोर्स तयार करण्यात आली होती.
- ईव्ही चार्जससाठी लोखंड, पोलाद आणि काही महत्वाचे सुटे भाग आवश्यक असतात. यात हिटींग आणि कुलिंग फॅन्स, पॉवर ट्रान्सफॉर्मर्स यांचा समावेश आहे. मात्र हे सर्वच मटेरिअल स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याचे ईव्ही उत्पादकांचे म्हणणे आहे.
- नव्या धोरणामुळे कंपन्यांना चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास अडचणी निर्माण होतील, अशी शक्यता टेस्लाने व्यक्त केली आहे.