EV charging Station: इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या वाढत असून त्या तुलनेत इव्ही चार्जिंग स्टेशनची संख्या अपुरी असल्याची ओरड वाहन मालकांकडून केली जाते. अनेक खासगी कंपन्या इव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायात उतरत आहेत. दरम्यान, आता पेट्रोल पंपावरही इव्ही चार्जिंग सुविधेचा विस्तार होत आहे. देशभरातील 9 हजार पेट्रोल पंपावर इव्ही चार्जिंगची सुविधा सुरू झाली आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या पाहून पेट्रोल पंपसुद्धा स्वत:ला अपग्रेड करण्याच्या तयारी आहेत.
10 पैकी 1 पेट्रोल स्टेशनवर इव्ही चार्जिंग सुविधा
भारतामध्ये सुमारे 87 हजार पेट्रोल पंप आहे. वर्षभरापूर्वी फक्त साडेतीन हजार पेट्रोल पंपावर इव्ही चार्जिंग सुविधा होती. मात्र, आता ही सुविधा वाढून 9 हजार पंपावर सुरू झाली आहे. प्रत्येक दहा पंपापैकी 1 पेट्रोल पंपावर इव्ही चार्जिंग सुविधा, असे प्रमाण झाले आहे. भविष्यात त्यात आणखी वाढ होऊ शकते.
चार्जिंगची चिंता
इव्ही कार मालकांमध्ये सध्याच्या घडीची सर्वात मोठी चार्जिंगची चिंता आहे. शहरांमध्ये अडचण येत नसली तरी महामार्गावरुन किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना अडचण येत आहे. ग्रामीण भागात इव्ही गाड्यांची विक्री वाढत आहे. मात्र, शहरांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. जर पेट्रोल पंपांवरील चार्जिंग सुविधा वाढली तर इव्ही गाड्यांची विक्री आणखी वाढू शकते.
इंडियन ऑइल पंपांवर सर्वाधिक इव्ही चार्जिंग स्टेशन
इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर सर्वाधिक इव्ही चार्जिंग स्टेशन आहेत. देशभरात इंडियन ऑइलचे 36,400 पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी 15% म्हणजेच 5,600 पंपांवर इव्ही चार्जिंग सुविधा आहे. तर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या 2 हजारांपेक्षा जास्त पंपांवर चार्जिंग सुविधा आहे. त्या खालोखाल BPCL पेट्रोल स्टेशनवर चार्जिंग सुविधा आहे. रिलायन्स, नायरा एनर्जी आणि शेल या खासगी कंपन्यांचे देशभरात 8,300 पंप आहेत. या खासगी स्टेशनवर अद्याप इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा थोड्या प्रमाणात आहे.
पुढील काही वर्षात 22 हजार पंपांवर चार्जिंग सुविधा होणार
इंडियन ऑइल, एचपीसीएल आणि बीपीसीएल या कंपन्या पुढील काही वर्षात 22 हजार पंपावर इव्ही चार्जिंग सुविधा सुरू करणार आहेत. 2024 पर्यंत 10 हजार पंपांवर चार्जिंग सुविधा सुरू करण्याचे ध्येय इंडियन ऑइल कंपनीने ठेवले आहे. तर HPCL 2025 पर्यंत 5 हजार पंपांवर ही सुविधा सुरू करणार आहे.