शेअर मार्केटमधील तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 10.43 लाख कोटींची भर घातली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार 29 मार्च 2023 पासून पाच सत्रात सेन्सेक्समधील तेजीने गुंतवणूकदार सुखावला. 6 एप्रिल 2023 अखेर बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 1043216.79 कोटींने वाढले आहे.
दोन आठवड्यातील 10 पैकी 3 दिवस शेअर मार्केटला सुट्टी होती. गेल्या आठवड्यात 30 मार्च रोजी रामनवमी निमित्त शेअर मार्केट बंद होते. चालू आठवड्यात 4 एप्रिल रोजी महावीर जयंती आणि आज 7 एप्रिल रोजी गुड फ्रायडे निमित्त बाजार बंद होता. मात्र मागील पाच सत्रात शेअर मार्केटमधील तेजीने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला आहे.
मागील पाच सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 2219.25 अंकांनी वधारला आहे. या तेजीने 'बीएसई'वरील कंपन्यांची मार्केटकॅप 26237776.13 कोटी इतके वाढले. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतणुकीचा ओघ वाढल्याने शेअर इंडेक्स वधारले. महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात व्याजदर वाढवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र बँकेने व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.5% वर कायम ठेवला आहे. आरबीआयने व्याजदरात वाढ न केल्याने बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले. रिअल इस्टेट, व्याजदरांशी संबधित क्षेत्र, बँका आणि वित्त संस्थांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली.
मागील आठवडाभरात धानी सर्व्हिसेस, इंडियन एनर्जी एक्सचेंज, वेल्सपन इंडिया, टाटा इन्व्हेस्टमेंट, एलआयसी, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, मारुती सुझुकी, अव्हेन्य सुपरमार्ट, एसबीआय, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स हे शेअर वधारले होते. गुरुवारी 6 एप्रिल 2023 रोजीच्या सत्रात सेन्सेक्स 143 अंकांच्या वाढीसह 59832.97 अंकांवर स्थिरावला.
सलग दुसऱ्या आठवड्यात शेअर निर्देशांक वधारले.त्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. यात स्वस्त झालेल्या ब्लुचिप शेअर्सला स्वस्त किंमतीत खरेदी करुन गुंतवणूकदारांना पोर्टफोलिओ संतुलित केल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेची व्याजदर जैसे थे ठेवण्याची भूमिका बाजारासाठी सुखद धक्का देणारी होती. मार्केटने आता तेजीची वाट धरली असल्याचे सॅमको म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी उमेश कुमार यांनी सांगितले.
(News Source : PTI)