आगामी वर्षात नव तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना मोठी डिमांड असणार आहे. त्यामध्येही विशेषत: असे तंत्रज्ञान जे सध्या बाल्यावस्थेत आहे. मात्र, भविष्यामध्ये त्याच्या वापराला मोठी मागणी असेल, अशा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती होत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी (R&D) येत्या काळात गुंतवणूक वाढणार आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याने त्यांचे शेअर्सही तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॅसकॉम आणि बोस्टन कंस्लटिंग ग्रुप (BCG) ने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
कोणत्या क्षेत्रांमध्ये वाढणार गुंतवणूक
एकूण तंत्रज्ञान क्षेत्रातील खर्चांपैकी ७० ते ८० टक्के खर्च नव तंत्रज्ञावर काम करणाऱ्या कंपन्यांवर २०३० सालापर्यंत होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालात अशी १२ क्षेत्रे निवडण्यात आली आहेत त्यांना हाय डिमांड असणार आहे. या क्षेत्रांना 'बिगेस्ट बेस्ट' असे म्हणण्यात आले आहे. यामध्ये ऑटोनॉमस अॅनॅलिटिक्स, ऑग्युमेंटेड रिअॅलिटी, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, कॉम्प्युटर व्हिजन, डीप लर्गिंन, डिस्ट्रिब्युटेड लेजर, एज कॉम्प्युटिंग, सेन्सर टेक्नॉलॉजी, स्मार्ट रोबॉट, स्पेस टेक, सस्टेनिबिलीटी(शाश्वत) टेक आणि 5G/6G या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाची बाजाराची गरज -
पुढील चार ते पाच वर्षांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तीन पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पादनांची गुणवत्ता अधिक सुधारणे, ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा आणि उत्पादनांच्या उच्च कार्यक्षमेतासाठी कंपन्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कंपन्यांना नवनवीन तंत्रज्ञानाकडे वळावे लागत आहे. लोकांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत, असे नॅसकॉमचे अध्यक्ष देबजानी घोष यांनी म्हटले आहे.
रोबोटिक्स, ऑटोमेशनला चांगले दिवस -
सॉफ्टवेअर अज अ सर्व्हिस (Software as s service- SaaS) सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या आणि यातील तंत्रज्ञानामध्ये मोठी सुधारणा होणार आहे. सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यात नवनवीन ट्रेंड येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. मेटाव्हर्स, ब्लॉकचेन, रोबोटिक्स क्षेत्रांमधीलही गुंतवणूक वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ऑटोनॉमस सिस्टिम, फाइव्ह जी, ग्रीन तंत्रज्ञान क्षेत्राला चांगले दिवस येणार असल्याचे, टेक महिंद्रा कंपनीचे चिफ ग्रोथ ऑफिसर जगदीश मित्रा यांनी म्हटले आहे.