Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Manappuram Finance: मनी लाँड्रींगप्रकरणी इडीची मणप्पुरम फायनान्सवर कारवाई; 143 कोटींची संपत्ती गोठवली

Manappuram Finance

देशातील आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्युशन (NBFC) मणप्पुरम फायनान्स या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ED raid On Manappuram Finance) कारवाई केली. कंपनीची 143 कोटी रुपयांची मालमत्ता इडीने गोठवली आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ठेवीदारांकडून अवैधरित्या पैसे गोळा केल्याचा आरोपही कंपनीवर आहे.

Manappuram Finance: देशातील आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्युशन मणप्पुरम फायनान्सवर सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली आहे. (ED raid On Manappuram Finance) मनी लाँड्रींग केल्याचे आरोप मणप्पुरम फायनान्सवर ठेवण्यात आले आहे. बुधवारपासून ही कारवाई सुरू आहे. केरळमधील कंपनीच्या मुख्यालयासह इतर सहा कार्यालयांवर ईडीने छापे मारले. या कारवाईत मणप्पुरम फायनान्सची 143 कोटींची संपत्ती गोठवली.

कंपनीचे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. पी. नंदकुमार यांच्याशी संबंधित आठ बँक खाती इडीने गोठवली आहेत. तसेच मणप्पुरम फायनान्सचे काही शेअर्ससुद्धा गोठवले आहेत. केरळमधील त्रिचूर येथे कंपनीचे मुख्यालय आहे. मनी लाँड्रींगसंबंधित काही कागदपत्रे आणि पुरावे मिळतात का? हे पाहण्यासाठी इडीने छापे मारले होते. बुधवार आणि गुरुवार दोन दिवस कारवाई सुरू होती. काल चौकशी संपल्यानंतर उशीरा इडीने 143 कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती दिली. 

मणप्पुरम फायनान्सवर काय आरोप आहेत?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहे. RBI ची नियमावली डावलून मणप्पुरम फायनान्ससने 150 कोटींच्या ठेवी नागरिकांकडून गोळा जमा केल्याचा आरोप आहे. तसेच मणप्पुरम फायनान्सने अनेक व्यवहार रोख रकमेने केले. (ED raids Manappuram Finance office) असे करताना KYC नियमांचे पालन केले नाही, अशी माहिती समोर आली आहे.

कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. नंदकुमार यांनी नागरिकांकडून ठेवीच्या स्वरुपात जमा केलेले पैसे स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवले. ही मालमत्ता त्यांनी पत्नी, स्वत: आणि मुलांच्या नावे खरेदी केली. तसेच मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्सही कुटुंबियाच्या नावे खरेदी केले, असे इडीने कारवाईनंतर म्हटले. Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत काय हाती लागलं?

कार्यालय आणि कंपनीचे मालक पी. व्ही नंदकुमार यांच्या घरी इडीने छापे मारले. यामध्ये मालमत्ता खरेदीचे 60 कागदपत्रे मिळाले आहेत. तसेच मनी लाँड्रींगसंबंधित काही इतर कागदपत्रे सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी कारवाई पूर्ण झाल्यानंतर सांगितले. मणप्पुरम अॅग्रो फार्म्स या दुसऱ्या एका कंपनीद्वारे अनेक रोखीने व्यवहार झाल्याची कागदपत्रेही इडीच्या हाती लागली आहेत. नागरिकांकडून जमा केलेल्या ठेवी अवैधरित्या जमा केल्याचे सक्तवसुली संचलनालयाने म्हटले आहे.

मणप्पुरम फायनान्स कंपनीचा इतिहास

मणप्पुरम फायनान्स ही एक बिगर बँकिंग वित्त संस्था असून कंपनीची स्थापना 1949 साली झाली आहे. 25 राज्यात कंपनीच्या चार हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. V. C पद्मनाभन यांनी कंपनीची स्थापना केली होती. सुरुवातीला कंपनी फक्त कर्ज वितरणाचे काम करत होती. मात्र, नंतर सुवर्ण कर्ज, मायक्रोफायनान्स, गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसाय कर्ज क्षेत्रातही कंपनीने पाऊल ठेवले.

दक्षिण भारतात कंपनीच्या व्यवसायाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. 29 एप्रिलला कंपनीने निधी उभारण्याचा निर्णय घेतला होता. कर्ज, डेट सिक्युरिटी पर्यायांद्वारे देशातून आणि परदेशातून पैसे उभारण्याचा प्रयत्न कंपनीचा आहे. मात्र, इडीच्या छाप्यानंतर कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत. तसेच कंपनीच्या प्रतिमेलाही धक्का पोहचला आहे.