Manappuram Finance ED raid: सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) मणप्पुरम फायनान्सच्या केरळ येथील कार्यालयावर छापे मारले आहेत. मणप्पुरम फायनान्स ही देशातील आघाडीची बिगर बँकिंग वित्त संस्था आहे. केरळमधील विविध ठिकाणांवरील कार्यालयात इडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. मनी लाँड्रिग प्रकरणी मणप्पुरम फायनान्सची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर बिगर बँकिंग वित्त संस्थांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इडीच्या छाप्याची माहिती पसरताच कंपनीचे शेअर्स आज 12 टक्क्यांनी कोसळले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहे. आरबीआयची नियमावली डावलून मणप्पुरम फायनान्ससने 150 कोटींच्या ठेवी नागरिकांकडून गोळा केल्याचा आरोप आहे. केरळमधील चार कार्यालयांवर इडीने छापा मारला. केरळमधील त्रिचूर येथे कंपनीचे मुख्यालय आहे. या कार्यालयातून मनी लाँड्रिगबाबत काही पुरावे मिळतात का? याबाबत अधिकाऱ्यांनी तपास केला. या बाबत आघाडीच्या माध्यमांनी मणप्पुरम फायनान्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. पीटीआय वृत्तवाहीनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सोबतच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मणप्पुरम फायनान्सने अनेक व्यवहार रोख रकमेने केले. (ED raids Manappuram Finance office) असे करताना KYC नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे इ़डीला कंपनीच्या कारभाराबाबत संशय आला. या व्यवहारासंबंधित काही कागदपत्रे आणि पुरावे मिळतात का? ते पाहण्यासाठी इडीने छापे मारले. याबाबत अधिकृत माहिती अद्याप पुढे आली नाही.
इडीची रेड पडताच शेअर्स 12 टक्क्यांनी ढासळले
मणप्पुरम फायनान्सच्या केरळमधील कार्यालयांवर छापे पडल्याची माहिती समजताच गुंतवणूकदारही गोंधळून गेले. कंपनीचे शेअर्स तत्काळ 12 टक्क्यांनी कोसळले. कंपनीच्या मुख्य कार्यालयासोबत मणप्पुरम फायनान्सचे प्रमोटर्स V P नंदकुमार यांच्या निवासस्थानाचीही तपासणी केली. इडीने छाप्यांबाबत अधिकृत माहिती जाहीर केली नाही. मात्र, लवकरच इडीकडून अधिकृत वृत्त मिळण्याची शक्यता आहे.
मणप्पुरम फायनान्स कंपनीचा इतिहास
मणप्पुरम फायनान्स ही एक बिगर बँकिंग वित्त संस्था असून कंपनीची स्थापना 1949 साली झाली आहे. 25 राज्यात कंपनीच्या चार हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. V. C पद्मनाभन यांनी कंपनीची स्थापना केली होती. सुरुवातील कंपनी फक्त कर्ज वितरणाचे काम करत होती. मात्र, नंतर सुवर्ण कर्ज, अल्पकर्ज, गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसाय कर्ज क्षेत्रातही कंपनीने पाऊल ठेवले.
दक्षिण भारतात कंपनीच्या व्यवसायाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. 29 एप्रिलला कंपनीने निधी उभारण्याचा निर्णय घेतला होता. कर्ज, डेट सिक्युरिटी पर्यायांद्वारे देशातून आणि परदेशातून पैसे उभारण्याचा प्रयत्न कंपनीचा आहे. मात्र, इडीच्या छाप्यानंतर कंपनीपुढील अडचणी वाढल्या आहेत. तसेच कंपनीच्या प्रतिमेलाही धक्का पोहचला आहे.