मोबाइल (Mobile) ही आता जीवनावश्यक बाब झालीय. केवळ इतरांसोबत संभाषण करण्यासाठीच नाही, तर जगाशी कनेक्ट राहण्यासाठी मोबाइलचा वापर होतोय. विविध आर्थिक व्यवहारदेखील मोबाइलद्वारे होत असतात. अशावेळी जर मोबाइल हरवला तर प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागण्याची शक्यता असते. म्हणूनच एखाद्याचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेल्यास तो सापडेपर्यंत जीव टांगणीला लागलेला असतो. आता मात्र अधिक चिंता करण्याची गरज नाही. कारण सरकार यावरचा तोडगा काढत आहे. ट्रॅकिंग सिस्टम (Tracking System) डेव्हलप केली जाणार आहे. त्यामाध्यमातून हरवलेला मोबाइल लवकर सापडण्यास मदत तर होईलच. त्यासोबतच तो ट्रेस करता येईल आणि ब्लॉकची (Block) सुविधाही मिळू शकेल.
Table of contents [Show]
ट्रेस किंवा ब्लॉक करू शकणार
सरकारच्या निर्णयाविषयी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं माहिती दिलीय. या प्रणालीद्वारे देशभरातले लोक त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ब्लॉक किंवा ट्रेस करू शकतील. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बॉडी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (CDoT) सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) प्रणाली चालवत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य भागासह काही दूरसंचार मंडळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली सध्या सुरू आहे. दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलेल्या माहितीनुसार, आता हीच प्रणाली संपूर्ण देशात सुरू केली जाऊ शकते.
प्रणालीसाठी सज्ज असल्याची माहिती
17 मे रोजी ती देशभर सुरू करण्याचा विचार आहे. मात्र तारखेबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. सीडीओटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प मंडळाचे अध्यक्ष राजकुमार उपाध्याय यांनी तारखेबद्दल काहीही सांगितलं नाही. मात्र हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतात सादर करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं म्हटलंय. या तिमाहीत ही प्रणाली संपूर्ण भारतात राबविण्यावर आम्ही भर देणार आहोत. कारण सध्या याबाबतची आमची तयारी पूर्ण झालीय. लोक त्यांचे हरवलेले मोबाइल फोन ब्लॉक आणि ट्रॅक करू शकतील.
आयएमईआय बंधनकारक
सर्व दूरसंचार नेटवर्कवर क्लोन केलेल्या मोबाइल फोनचा वापर शोधण्यासाठी सीडीओटीनं (CDOT) ने नवीन फीचर्स दिलीत. सरकारनं भारतात मोबाइल उपकरणांची विक्री करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (International Mobile Equipment Identity) हा 15 अंकी क्रमांक देणं बंधनकारक केलंय. मोबाइल नेटवर्क्सकडे आयएमईआय क्रमांकाची सुची असेल. या माध्यमातून अनधिकृतरित्या होणाऱ्या घडामोडी समजू शकतील.
काही राज्यांमध्ये वापर
दूरसंचार ऑपरेटर आणि सीईआयआर (CEIR) प्रणालीकडे डिव्हाइसचा आयएमईआय (IMEI) नंबर आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबरची माहिती असेल. काही राज्यांमध्ये ही माहिती हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल शोधण्यासाठी सीईआयआरद्वारे वापरली जाईल. त्यामुळे हरवलेले मोबाइल शोधण्यात मदत होणार आहे.
अॅपची मदत
मोबाइल हरवल्यानंतर सध्या विविध अॅप्सच्या माध्यमातून तो शोधण्यास मदत होते. त्यासाठी आधीच मोबाइलमध्ये संबंधित अॅप डाउनलोड करून त्यात आवश्यक असणारी माहिती भरून आणि परमिशन देऊन ठेवावी लागते. त्याचबरोबर गुगलच्या युवर टाइमलाइन (Your timeline) माध्यमातूनही तो शोधण्यास मदत होते.