माहिती तंत्रज्ञानातील प्रगती फायद्याची की धोक्याची यावर अनेक चर्चा घडतात. तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) हे आगामी काळात मनुष्य बळाचा वापर कमी करणार असेही म्हटले जाते. थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड चालणार असे भाकीत अनेकांनी केल्याचे तुम्हीही ऐकले असेल. ते भाकीत आता खरे ठरत असल्याचे एक उदाहरण बंगुळूरूमध्ये समोर आले आहे. बंगळुरूमधील E-COMMERCE क्षेत्रातील दुकान (Dukaan) या प्रसिद्ध कंपनीने आपल्या सपोर्ट स्टाफ मधील तब्बल 90 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यांच्या ठिकाणी कंपनीने आता एआय चॅटबॉटचा (AI Chatbot) वापर सुरू केला आहे.
रिस्पॉन्स टाईम एका सेकंदावर
दुकान (Dukaan) कंपनीचे को-फाऊंडर आणि सीईओ सुमित शाह यांनी या कारवाईबाबत माहिती देताना म्हणाले आहे, की आमच्यासाठी हा निर्णय कठीण होता. मात्र , हा निर्णय घेण्याची आवश्यकता होती. आम्ही आमच्या कंपनीमध्ये 90% सपोर्ट स्टाफच्या ठिकाणी एआय चॅटबॉट वापरत आहोत.आमच्या या निर्णयामुळे आमचा रिस्पॉन्स टाईम हा 1.44 मिनिटांवरून एका सेकंदावर आला आहे. तसेच, आमच्या यूजर्सच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्हाला यापूर्वी जास्तीत जास्त 2 तास 13 मिनिटांचा कालावधी लागत होता. तो चॅटबॉटच्या वापरामुळे 3 मिनिटे 12 सेकंदावर आला असल्याचेही शाह यांनी सांगितले. शाह यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
वेळेसह पैशांची बचत-
शाह म्हणाले की आम्ही जवळजवळ संपूर्ण टीम बदलली आहे. सध्याची जागतिक अर्थव्यवस्था पाहता, कंपन्या जास्त नफा मिळवण्याकडे लक्ष देत आहेत. आम्ही देखील आर्थिक नफ्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. AI Chatbot मुळे आमचा वेळच नाही तर खर्च देखील 85 टक्क्यांनी कमी झाला आहे. तसेच आम्ही यापुढे Bot9 या नावाने AI ची सर्व्हिस ही देणार असल्याचेही शाह यांनी म्हटले आहे. या सर्व्हिसच्या माध्यमातून ते इतर कंपन्यांना चॅटबॉट (CHATBOT) उपलब्ध करून देणार आहेत.
कंपनीने केवळ कस्टमर सपोर्ट स्टाफ कमी केला नाही तर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, सुमारे 23 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर 2023 च्या सुरुवातीला किमान 57 कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले होते.