Headload labors strike in the state: अर्थसंकल्प जाहिर होण्यापूर्वी, महाराष्ट्रातील माथाडी कामगारांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. मुंबईतील घाऊक बाजारपेठांमध्ये भाज्या, फळे, धान्य कोणताही माल 1 फेब्रुवारीच्या पहाटेपासून आलेला नाही. कामगारांनी त्यांचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवले जावे आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा लाक्षणिक संप पुकारण्या आला आहे. या संपामुळे आज मुंबईसह इतर शहरांमध्ये भाजीपाला, फळे, कडधान्य आदींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आज भाजीपाल्याचा दर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात एकूण 36 माथाडी कामगरांची मंडळे आहेत. ही संघटीत मंडळे असून इतर असंघटीत मंडळे आहेत. मात्र सध्या या 36 मंडळांनी संप पुकारला आहे. 30 जानेवारी रोजी नवी मुंबईतील माथाडी भवनात घेतलेल्या पत्रकार परीषदेत 1 फेब्रुवारीच्या संपाविषयी सांगण्यात आले होते. बाळासाहेबांची सेना आणि भाजप यांचे नवे सरकार स्थापन होऊन बराच काळ उलटला, तरी माथाडी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीच बैठक घेतली नाही, कामगारांच्या समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, याबद्दल सर्व कामागारांमध्ये सरकारविषयी असंतोष आहे. सरकारचे कामगारांकडे लक्ष वळवण्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे, असे अण्णाभाऊ पाटील मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णसाहेब यांनी सांगितले.
माथाडी कामगारांच्या समस्या काय आहेत? (What are the Headload labors issues?)
माथाडी कामगारांना पन्नास किलोपेक्षा अधिक सामान वाहून नेण्यास सांगू नये, असा नियम आहे. मात्र तरी अनेक व्यापारी हा निमय धाब्यावर बसवून कामगारांना राबवून घेतात. अनेक व्यापारी जास्त माल वाहून नेतात, मात्र पैसे पूर्ण देत नाहीत. अशा व्यापरांवर कारवाई व्हावी तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची साधारण पण महत्त्वाची मागणी आहे, असे माथाडी कामगारांचे कंत्राटदार विठ्ठल जाधव यांनी सांगितले.
माथाडी कमगारांच्या दैनंदिन समस्या आहेत, ज्या लवकरात लवकर सोडवणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे, विविध प्रभागांअंतर्गत न्याय निवाडा करणे गेल्या अनेक महिन्यांपासून थांबले आहे, हा प्रश्न निकली काढला पाहिजे. तसेच माथाडींसाठी असलेल्या सल्लागार समितीची पुनर्रचना करून पद भरती करणे गरजेचे आहे. तसेच या समितीवर कामगार प्रतिनिधींना सदस्य म्हणून नेमले पाहिजे. सुरक्षा रक्षक कामगारांच्या सल्लागार समितीचीही पुनर्रचना होणे आवश्यक आहे. यासोबत इतर सर्वच माथाडी मंडळांची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यासह माथाडी मंडळाच्या कामकाजात, नव्या कामाचे विभाजन करण्यात कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे. माथाडींसाठी असलेल्या कायदा आणि विविध मंडळांच्या योजना यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने विशेष समिती गठीत करून लवकर यासंबंधिचा मसुदा बनवावा. रेल्वे यार्डात काम करत असलेल्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, त्या त्यांना मिळाव्यात. तसेच कामगारांशी हुज्जत घालणाऱ्या, कामात व्यत्यत आणून वाद घालणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालून त्यांना बाजारापासून दूर ठेवण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात. मापाडी किंवा तोलणार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना बाजार सिमितीच्या कार्यालयीन सेवेत घ्यावे. तसेच, सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवी मुंबई परिसरात घरे देण्यात यावीत, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, असे माथाडी कामगारांचे कंत्राटदार विजय कांबळे यांनी सांगितले.
माथाडी कामगार दिवस-रात्र अंग मेहनतीचे काम करत असतो. या बाजारातील सर्वात शेवटच्या टप्प्यात हा कामगार येत असला, तरी त्याचे काम महत्त्वाचे आहे. त्याच्या संपामुळे आज शहरांमध्ये पाली-पाला, धान्ये, फळे, कडधान्य, फुले पोहोचत नाही आहेत. आमच्या संपामुळे नागरिकांना आज त्रास सहन करावा लागत आहे, याची आम्हाल कल्पना आहे. मात्र आम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून विविध त्रास सहन करावा लागत आहे, आमच्या समस्या या कोणतेच सरकार ऐकून घेत नाही. तात्पुरता, तुटपुंजी उपाययोजना केल्या जातात, मात्र त्याचा काही फायदा होत नाही. नवी मुंबईत मोठ्या बाजारात काम करणाऱ्या आम्हा कामगारांना रस्त्यावर, झोपडपट्टीत, चाळीत राहावे लागते. आमच्या मंडळ आणि सल्लागार समिती व्यवस्थित कामे करत नसल्यामुळे न्याय निवाड्याची प्रकरणे पडून आहेत, तर समित्यांवर पद भरती झाली नसल्यामुळे दैनंदिन कामे करण्यातही विविध अडचणी येत आहेत, यामुळे कामे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडून कंत्राट मिळते, त्यांची कामे पूर्ण होऊ शकत नाहीत, असेही कांबळे म्हणाले.
संपाचा काय परिणाम होत आहे? (What is the impact of the strike?)
महाराष्ट्रात माथाडी कामगारांचा संप असल्यामुळे सर्वप्रथम भाजी बाजारावर परिणाम होतो. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, पालघर, ठाणे आदी विविध ठिकाणाहून येणारा माल चढवण्यासाठी माणसे नसल्यामुळे माल घेऊन ट्रक शहरांमध्ये आलेले नाहीत. त्यात इतर मालाची ने-आणही थांबली आहे. बांधकामाच्या कामांनाही अल्पविराम लागला आहे, तसेच नाका कामगारही कामावर आलेले नाहीत, त्यामुळे खाजगी बांधकाम आणि अन्य कामे रखडली आहेत, असे कंत्राटदार कांबले यांनी सांगितले.
एपीएमसी बाजारात दिवसाला केवळ भाजीपाला, फळे यांच्यामुळे साधारण 30 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होते. सामानाचे ट्रक न आल्यामुळे आज बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे इतर बाजारांना, किरकोळ विक्रेत्यांनाही भाजी पुरवठा कमी प्रमाणत केला असून भाज्यांचे दर आज नेहमीच्या तुलने 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. तर इतर इंग्लिश अर्थात एक्झॉटीक आणि हायब्रीड भाज्यांच्या किंमतीत विशेष फरक पडेलला नाही. फळांची, कडधान्यांची किंमत 20 टक्क्यांपर्यंत महागली आहे. माल पुन्हा सुरळीत येऊ लागला की किंमती कमी होतील, असे घाऊक एपीएमसी बाजारातील घाऊक व्यापारी दत्तात्रय पुकळे यांनी सांगितले.
दादर येथील किरकोळ भाजी विक्रेत मंगेश कोयते म्हणाले की, मुळात कालची भाजी पुरवून विकत आहे. काही भाजी विक्रेत्यांना ताज्या भाज्या मिळाल्यात तर काहीजण कालच्याच विकत आहेत. भाज्या लवकर खराब होतात त्यामुळे नागरिक घेतही नाहीत. अशावेळी आज काही विशेष धंदा होईल असे वाटत नाही. तसेच ऑनलाईन भाजी विक्रेत्यांना पुरवली जाणाऱ्या भाजीचा आड पुरवठा बंद ठेवला आहे.
आज पालघर, दादर, वाशीवरुनही भाजी अगदी तुरळक प्रमाणात आली आहे. त्यामुळे आज बोरीवली, कांदिवली, मालाड, दहिसर भागात भाज्यांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी महागले आहेत. अनेक किरकोळ भाजी विक्रेत्यांनी आज त्यांची पथदुकाने लावलेली नाहीत, असे किरकोळ विक्रेत्यांना भाजी पुरवठा करणारे प्रकाश येरसे आणि मीना तांबे यांनी सांगितले.
माथाडी कामगारांच्या लाक्षणिक संपामुळे भाजी, फळे, कडधान्ये यांच्या तुटवडा जाणवत आहे. या दैनंदिन सामग्रीच्या किंमती वाढल्या आहेत. बजेटपूर्वी सुरू झालेल्या या संपामुळे आज जीवनावश्यक वस्तूंपैकी एक असलेल्या भाजी-फळे महागले आहे. तसेच अनेक बांधकामाची कामे रखडली आहेत, सामान ने-आण करणे थांबले असल्यामुळे आज इतर सामानही लक्ष्यित ठिकाणी पोहोचणार नाही आहे. शासनाने कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक घेतली तर कामगार पुन्हा कामावर रुजू होऊन सर्व कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            