शेअर मार्केटमध्ये आज शुक्रवारी जोरदार घसरण सुरु असतानाच ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स या कंपनीने जबरदस्त एंट्री घेतली. बीएसई एसएमई मंचावर ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सचा शेअर 90% प्रिमीयमसह सूचीबद्ध झाला. पहिल्याच दिवशी कंपनीने आयपीओमधील भाग्यवान गुंतवणूकदारांना मालामाल केले.
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सने आयपीओसाठी 54 रुपये प्रती शेअर भाव निश्चित केला होता. प्रत्यक्षात बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या शेअरची 102 रुपयांना नोंदणी झाली. ज्या गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप झाले होते त्यांना पहिल्याच दिवशी बंपर नफा मिळाला. आज इंट्रा डेमध्ये ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सचा शेअर 107.10 रुपयांवर गेला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दुप्पट कमाई केली.
ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला होता. कंपनीचा IPO इश्यू 243.7 पटीने सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा 330.82 पटीने सबस्क्राईब झाला होता. उच्च नेटवर्थ असलेल्या गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 287.8 पटीने सबस्क्राईब झाला होता. त्यामुळे ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सच्या लिस्टिंगबाबत जाणकारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.
लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरमध्ये तेजी होती. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सचा ग्रे मार्केट प्रिमीयम प्रती शेअर 75 रुपयांवर गेला होता. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स आयपीओमधून 33.97 कोटींचे भांडवल उभारले आहे. कंपनीने 13 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान हिस्सा विक्री केली होती.
वर्ष 2017 मध्ये ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स ही ड्रोन परिसंस्थेसाठी लागणारी उच्च दर्जाची ड्रोन तयार करणारी कंपनी आहे. पुण्यात या कंपनीचे मुख्यालय आहे. त्याचबरोबर ड्रोन सर्व्हेसाठी आवश्यक डेटा प्रोसेसिंग देखील कंपनीकडून केला जातात. कंपनीकडे ड्रोन हातळणाऱ्या तज्ज्ञांची फौज आहे.