अनेकदा तुम्ही कुठल्या दुकानात खरेदीसाठी जात असता. पेमेंट करताना जेव्हा केव्हा तुम्ही क्रेडीट कार्ड वापरता तेव्हा काही दुकानदार तुम्हांला अतिरिक्त चार्ज लागेल अशी माहिती देतात. सामान्य ग्राहकांना देखील नियम माहिती नसल्यामुळे दुकानदार जे काही सांगतोय ते खरेच आहे असे वाटते. अशावेळी दुकानदार आपल्याला अतिरिक्त 1-2% रक्कम बिलात वाढून देतो आणि आपण पेमेंट देखील करतो. जर तुमच्यासोबत असा कधी प्रसंग घडला असेल तर सावधान! क्रेडीट कार्ड स्वाइप केल्यानंतर कायद्यानुसार त्यावरील प्रक्रिया शुल्क हे व्यापाऱ्यानेच भरायचे असते. दुकानदार जर हे प्रक्रिया शुल्क ग्राहकांना भरायला जर सांगत असेल तर ग्राहक दुकानदाराची तक्रार देखील करू शकतो. चला तर जाणून घेऊया नेमका नियम काय सांगतो आणि ग्राहक म्हणून आपण काय केलं पाहिजे.
POS मशीन वापरून पेमेंट करताय?
जेव्हा तुम्ही POS (Point of Sale) मशीनवर तुमचे कार्ड स्वाइप करता, तेव्हा व्यापाऱ्याला POS मशीन वापरण्यासाठी बँकेला भाडे शुल्क म्हणून काही रक्कम (सुमारे 2%) बँकेला द्यावी लागते.म्हणजेच जेव्हा एखादा ग्राहक क्रेडिट कार्ड वापरून वस्तू किंवा सेवांसाठी पैसे देतो, तेव्हा व्यापाऱ्याला व्यवहार शुल्क आकारले जाते.. हे शुल्क व्यापाऱ्याच्या वतीने व्यवहार हाताळणार्या बँक किंवा पेमेंट प्रोसेसरद्वारे आकारले जाते. परंतु, हे शुल्क व्यापाऱ्याने व्यवसाय चालवण्याच्या खर्चाचा भाग म्हणून, आणि विशेषतः, POS द्वारे पेमेंट घेण्याची सोय म्हणून भरावी लागते.कारण ग्राहकाकडून पैसे घेण्याची सुविधा ही व्यापाऱ्याने बँकेकडून घेतलेली असते, ग्राहकांनी नाही. त्यामुळे पैसे घेण्याची सुविधा जर व्यापारी घेत असेल तर मग त्याचे शुल्क ग्राहकाने का भरावे? असा सवाल खरे तर ग्राहकांनी विचारायला हवा.
RBI काय सांगते?
अशाप्रकारच्या अनेक तक्रारी गेल्या काही वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आल्या आहेत. त्यावर निर्णय देताना RBI हे स्पष्ट केले आहे की क्रेडीट कार्ड घेण्यासाठी ग्राहक आपल्या बँकेला निर्धारित शुल्क देत असतो. सदर बँक देखील नियामनुसार त्यावरचा देखभाल खर्च, सेवा शुल्क आकारत असते. त्यामुळे ग्राहक घेत असलेल्या सेवांचे शुल्क भरतच असतो. परंतु , कार्ड स्वाइप करणारे POS मशीन व्यापाऱ्याने त्यांच्या सोयीसाठी घेतलेले असते, तेव्हा त्याचे शुल्क व्यापाऱ्यांनीच भरले पाहिजे. जर व्यापारी ग्राहकांवर प्रक्रिया शुल्क आकारत असेल तर ते न्याय्य नाही. ग्राहक याविरोधात तक्रार देखील करू शकतात असे RBI ने म्हटले आहे. तसेच तक्रारीत तथ्य आढळल्यास व्यापाऱ्याची POS-संबंधित सुविधा रद्द देखील केली जाऊ शकते. त्यामुळे एक सजग ग्राहक म्हणून आपले अधिकार आपल्याला माहिती असायला हवेत. व्यापाऱ्याकडून जर तुमचे आर्थिक शोषण होत असेल तर त्याला जाब विचारायला विसरू नका