Register Marriage Cost in Mumbai: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे आणि प्रत्येक जण तो आपापल्यापरीने एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण स्वत:च्या आणि कुटुंबाच्या हौसेखातर भरमसाठ पैसे खर्च करून मोठ्या धामधुमीत लग्न करतात. काही जण वैदिक पद्धतीने मंदिरात किंवा निवडक नातेवाईकांच्या उपस्थित कमीत कमी खर्चात लग्न करतात. तर काही जण फक्त तीन-चार साक्षीदारांच्या मदतीने कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यास पसंती देतात.
आपल्याकडे भारतात धर्मानुसार, जातीनुसार, समाजाच्या चालीरीतीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करण्याची पद्धत आहे आणि याला समाजाची रितसर मान्यता आहे. याचबरोबर कायद्याला धरून म्हणजे कायदा हाच साक्षीदार मानून लग्न करण्याची पद्धत आहे; त्याला रजिस्टर मॅरेज म्हणतात आणि ही लग्नाची औपचारिक पद्धत मानली जाते. या पद्धतीद्वारे एखादे जोडपे लग्न करून नवरा-बायको होऊ शकतात.
मुंबईत रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे असेल, तर ते एकदम सोप्पे आहे. यासाठी तुम्हाला तुमची ओळख असलेले पुरावे, सर्वप्रथम तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे की नाही. हे कळण्यासाठी वयाचा पुरावा, त्यानंतर राहण्याचा पुरावा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोघांकडून किमान तीन साक्षीदार लागतात. आता आपण रजिस्टर पद्धतीने लग्न करताना कोणत्या स्टेप्सचा वापर होतो. हे समजून घेऊ.
Table of contents [Show]
स्वत:ची ओळख पटवून देणे
सर्वप्रथम लग्न करणऱ्या स्त्री-पुरुषांना कागदपत्राद्वारे स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागते. जसे की, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या पुराव्यांनी स्वत:ची ओळख सिद्ध करावी लागते. जर तुमच्याकडे यापैकी एकही पुरावा नसेल तर तुम्ही शपथपत्राद्वारे स्वत:ची ओळख पटवून देऊ शकता.
सरकारी कार्यालयात लग्न करा
जर तुम्ही स्वत:ची ओळख पटवून देण्यात यशस्वी झाला तर तुम्ही सरकारी कार्यालयात विवाह अधिकाऱ्यासमोर रीतसर लग्न करू शकता. पण सरकारी अधिकाऱ्यासमोर लग्न लावताना आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी अर्ज, पुरावे आणि फी अशी कागदपत्रे लागतात. जर तुम्हाला सरकारी कार्यालयात लग्न करायचे नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी ही करू शकता.
रजिस्ट मॅरेजसाठी किती फी घेतात?
भारतात मुंबई हे लग्न करण्यासाठी सर्वांत प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. मुंबईत कोर्टात, अधिकाऱ्यांसमोर, सरकारी कार्यालयाबाहेर असे वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करता येते. मुंबई महापालिकेच्या कार्यकक्षेत लग्नासाठी अर्ज केला असेल तर, महत्त्वाच्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी, पडताळणीसाठी त्याच्या अस्सल प्रती, फोटो आणि लग्नाची फी 1300 रुपये असा खर्च येतो.पण प्रत्यक्षात मात्र या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी किमान 10 ते 15 हजारांचा खर्च येतो.
एजंटच्या मदतीने प्रक्रिया सुरळित होऊ शकते
स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार रजिस्टर पद्धतीने लग्न करण्यासाठी फॉर्मची फी 300 रुपये आणि लग्नाचे सर्टिफिकेट तयार करण्यासाठी येणारा खर्च 1000 रुपये असे पकडून सरकारी नियमानुसार रजिस्टर लग्नासाठी फक्त 1300 रुपये खर्च अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षातील ग्राऊंड रिअॅलिटी पाहता या सर्व गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. अर्ज केल्यानंतर लग्नाची तारीख निवडणे, 30 दिवसांचा नोटीस कालावधी पूर्ण करणे किंवा इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नियमाने थोडा वेळ लागतो. पण सध्या काही एजंटच्या मदतीने ही प्रक्रिया अगदी एक ते दोन दिवसांतही पूर्ण होते. यासाठी एजंट अधिकचे पैसे घेतात. सध्याच्या रेटनुसार 10 ते 15 हजारांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाते, अशी माहिती अॅड् विरेन्द्र नेवे यांनी 'महामनी'ला दिली.