पंढरपूरचा विठोबाराया म्हणजे महाराष्ट्राचं दैवत. दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री अशा 4 वाऱ्या केल्या जातात. पैकी आषाढी आणि कार्तिकी वारीला विशेष महत्व आहे. या दोन वाऱ्यांना भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. वारी आणि दिंडी यात एक मुलभूत फरक आहे.
अनेकांना या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटू शकतात. मात्र वारी म्हणजे तुमच्या घरापासून तुम्ही पंढरपूरच्या विठोबारायाच्या मंदिरापर्यंतचा प्रवास होय. तर दिंडी म्हणजे पालखीसोहळ्यांमध्ये सामील होणे होय. महाराष्टात एकूण 10 मुख्य पालखी सोहळे आहेत. यांत संत नामदेव महाराज ( पंढरपूर, सोलापूर ),संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर, जळगाव ), संत एकनाथ महाराज ( पैठण, औरंगाबाद ), संत निवृत्ती महाराज ( त्र्यंबकेश्वर, नाशिक ), संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड, पुणे ), संत तुकाराम महाराज ( देहू, पुणे ), संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी, पुणे ), संत सोपानदेव महाराज ( सासवड, पुणे ), रुक्मिणी माता ( कौडन्यपूर, अमरावती ), संत निळोबाराय महाराज ( पिंपळनेर,अहमदनगर) यांचा समावेश आहे. या संताच्या भूमीतून पालखीसह पंढरपुरात जाणे म्हणजे दिंडी होय. या 10 मुख्य पालखी सोहळ्यांशिवाय हजारो दिंड्या यांत सहभागी होत असतात.
वारीचे नियोजन भाविक आपापल्या पद्धतीने करत असतात मात्र दिंडीचे नियोजन संबंधित संस्थान, ट्रस्टला करावे लागते. नियोजन म्हटले की पैसा हा आलाच. आषाढी यात्रेला लाखो भाविक हजेरी लावत असल्यामुळे या यात्रेत कोटींची उलाढाल होत असते.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे नियोजन आळंदी संस्थान करत असते, या पालखी सोहळ्यात जवळपास 500-600 छोट्या मोठ्या दिंड्या सामील होतात. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन देहू संस्थान करते, या पालखी सोहळ्यात 300-400 दिंड्या सामील होत असतात. संबंधित संस्थान दिंडीचे नियोजन करत असल्याने दिंडीला क्रमांक देणे, त्यांच्या विसाव्याची, थांब्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे अशी कामे देखील त्यांनाच करावी लागतात.
दिंडीत सहभागी होण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?
प्रत्येक दिंडीचे स्वतंत्र नियोजन असते. दिंडीचा कालावधी हा 20 दिवस ते 2 महिने असाही असतो. पंढरपूर ते गावाचे अंतर यानुसार दिंडीचा कालावधी देखील कमी जास्त होत असतो. दिंडीच्या प्रवासात शिधा, किराणा, औषध, सोबत असलेल्या गाड्यांसाठी पेट्रोल-डीझेल अशी व्यवस्था करावी लागते.
हा सगळा खर्च भागवण्यासाठी दिंडीत सामील होण्यासाठी वारकरी मंडळीकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. या शुल्कातूनच दिंडीचे आर्थिक नियोजन होत असते. दिंडीचे फड मालक हे दिंडीचे व्यवस्थापक असतात. तेच या दिंडीचा आर्थिक हिशोब ठेवतात. सध्याच्या काळात 1000-1200 रुपये इतके सुविधा शुल्क दिंडीत सामील होणाऱ्या वारकरी मंडळींकडून घेतले जाते. ज्या वारकऱ्यांना पैसे देणे झेपत नसेल त्यांच्याकडून पैशासाठी आग्रह केला जात नाही. भक्तीमार्गाचे पाईक असलेले वारकरी सगळ्यांनाच सांभाळून घेतात.
दिंडीची होते खरेदी-विक्री!
पूर्वीच्या काळी गावागावातून असंख्य वारकरी दिंडीत सामील होत असत. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे पूर्णवेळ वारीत जाणे अनेकांना शक्य होत नाही. दळणवळणाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे आता फक्त 1-2 दिवसांत पंढरपूरला जाऊन येण्याचे लोक पसंत करतात. यामुळे वर्षानुवर्षे सुरु असलेल्या दिंडीवर देखील आता परिणाम जाणवू लागला आहे.
दिंडीचे आर्थिक व्यवस्थापन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ज्यांना दिंडी चालवणे शक्य होत नाही असे फडकरी थेट दिंडीच विकतात. म्हणजेच दिंडीचे व्यवस्थापन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वर्ग केले जाते. या प्रक्रियेत पैशाची देखील उलाढाल होते. दिंडीची अशी खरेदी विक्री ही साधारण बाब आहे. अलीकडच्या काळात 4 ते 5 लाखांच्या आसपास काही दिंड्यांची खरेदी-विक्री झाली आहे.