इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी यांची गुंतवणूक असलेल्या दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टम कंपनीकडून लवकरच शेअर्सचे वाटप केले जाणार आहे. दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमच्या प्रारंभिक समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. कंपनीचा 412 कोटींचा आयपीओ 5.44 पटीने सबस्क्राईब झाला.
दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमकडून 9 मार्च 2023 रोजी शेअर वाटप (Divgi TroqTransfer IPO allotment) केले जाण्याची शक्यता आहे. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 4.31 पटीने सबस्क्राईब झाला. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर (NII) आणि क्वालिफाईड इन्स्टीट्युशनल इन्व्हेस्टरचा हिस्सा अनुक्रमे 1.4 पट आणि 7.83 पटीने सबस्क्राईब झाला आहे. त्यामुळे दिवगी टॉर्कट्रान्सफरची दमदार लिस्टींग होण्याची शक्यता आहे.
दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमचा IPO हा वर्ष 2023 मधील पहिला इश्यू आहे. कंपनी समभाग विक्रीतून 412 कोटींचे भांडवल उभारणार आहे. या आयपीओत शेअर्ससाठी 1 मार्च 2023 ते 3 मार्च 2023 पर्यंत बोली लावण्यात आली. आयपीओसाठी प्रती शेअर 560 ते 590 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. एक लॉट हा किमान 25 शेअर्सचा होता. दिवगी टॉर्कट्रान्सफर कंपनीत इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी यांची गुंतवणूक आहे. त्यामुळे आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली आहे.
दिवगी टॉर्कट्रान्सफर आयपीओच्या माध्यमातून नंदन निलेकणी आणि त्यांचे कुटुंबीय 14.40 लाख शेअर्सची विक्री करतील. कंपनीने यापूर्वीच अॅंकर इन्व्हेस्टरकडून 185 कोटींचा निधी उभारला आहे. 12 म्युच्युअल फंडांना कंपनीने प्रती शेअर 590 रुपयांनी 31 लाख 43 शेअरचे वाटप केले. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत दिवगी टॉर्कट्रान्सफरला 26 कोटींचा नफा झाला होता. याच तिमाहीत कंपनीला 137 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. आर्थिक वर्ष 2020 आणि 2022 या काळात कंपनीच्या नफ्यात दरवर्षी 28.30% वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ग्रे मार्केटमधील तेजी ओसरली
ग्रे मार्केटमध्ये दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमच्या शेअर प्रिमीयममध्ये आज घसरण झाली. ग्रे मार्केटमध्ये आज बुधवारी 8 मार्च 2023 रोजी दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमचा शेअर 35 रुपये प्रिमीयमवर ट्रेड करत आहे. यापूर्वी प्रिमीयम 60 रुपयांवर गेला होता. 14 मार्च 2023 रोजी कंपनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्या 9 मार्च 2023 रोजी दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमकडून शेअरचे वाटप होणार आहे. 14 मार्च 2023 रोजी दिवगी टॉर्कट्रान्सफरचा शेअर लिस्ट होणार आहे.
असा चेक करा अलॉटमेंट (Follow Steps to Check Allotment)
गुंतवणूकदारांना बीएसई (BSE) वेबसाईटवर अलॉटमेंट स्टेटस चेक करता येईल. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करु शकता. दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टमच्या आयपीओसाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Link Intime India Private Ltd) ही कंपनी रजिस्ट्रार आहे.
- बीएसई वेबसाईटला भेट द्या.
- कोणत्या कंपनीचा इश्यू आहे त्याला निवड करा.
- अॅप्लिकेशन नंबर किंवा पॅनकार्ड क्रमांक सादर करुन अलॉटमेंट तपासा.