Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Rupee: डिजिटल रुपी पायलट प्रोजेक्टला वेग; आणखी ग्राहक आणि बँकांचा समावेश होणार

e rupee

Image Source : www.cryptotimes.com

डिजिटल चलन बाजारात लाँच होण्याआधी त्यात काही त्रुटी आहेत का? ते व्यवस्थित काम करते का? काही सुधारणेची गरज आहे का? या अनुषंगाने प्रायोगिक तत्वावर वापर सुरू आहे. यासाठी बँका, दुकानदार, ग्राहक यांचा पायलट प्रकल्पात समावेश केला आहे. चालू आर्थिक वर्षात पायलट प्रोजेक्टचा विस्तार वाढवणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Digital Rupee: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील वर्षी डिजिटल रुपी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लाँच केला. (Central Bank Digital Currency (CBDC) या डिजिटल चलनाला ई-रुपी असेही म्हणतात. सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत असून ग्राहक, दुकानदार आणि बँकांचा यात समावेश आहे. आता या पायलट प्रकल्पाला आणखी वेग देण्यात येणार आहे. आरबीआय आणखी नवे ग्राहक, ठिकाणे आणि बँकांचा समावेश प्रकल्पात करणार आहे.

डिजिटल रुपीची चाचणी

हे डिजिटल चलन बाजारात पूर्णपणे लाँच होण्याआधी यात काही त्रुटी आहेत का? ते व्यवस्थित काम करते का? काही सुधारणेची गरज आहे का? या अनुषंगाने प्रायोगिक तत्वावर वापर सुरू आहे. दरम्यान कोणत्या बँका, ग्राहक किंवा ठिकाणांचा यात समावेश करण्यात येईल हे आरबीआयाने सांगितले नाही.

डिजिटल रुपी सर्वांसाठी लाँच झाल्यास बाजारातून कागदी चलनाचा वापर आणखी कमी होईल. कारण, डिजिटल स्वरुपात ग्राहकांना मोबाइल अॅपद्वारे पैसे पाठवता येतील. तसेच दुकानात शॉपिंग केल्यानंतर टोकन स्वरुपात ई-रुपी पाठवता येतील.

आघाडीच्या बँकांचा चाचणीत समावेश

या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 8 बँकांची निवड करण्यात आली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचा डिजिटल रुपी प्रोजेक्टमध्ये समावेश आहे. आता यात आणखी काही नव्या बँका सहभाग घेतील. सध्या ज्या दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचेशे नोटा चलनात आहे त्याच डिजिटल स्वरुपात मोबाइलमध्ये येतील. त्यांनाही व्यवहार करताना आरबीआयची अधिकृत मान्यता असेल.

डिजिटल रुपी होलसेल आणि रिटेल काय आहे? 

दरम्यान, आरबीआयने डिजिटल रुपीचे दोन पर्याय बाजारात आणण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार CBDC होलसेल आणि CBDC रिटेल असे दोन प्रकार असतील. यातील होलसेल हा प्रकार बँका, वित्त संस्था आणि काही ठराविक आर्थिक संस्थांमध्ये व्यवहार करताना ग्राह्य असेल. याचा वापर सर्वसामान्य ग्राहकांसाठी नसेल. मात्र, CBDC रिटेल नुसार, सर्वसामान्य ग्राहक, दुकानदार, खासगी उद्योगांसाठी उपलब्ध असेल.

होलसेल डिजिटल रुपीद्वारे सरकारी पातळींवरील रोख्यांचे व्यवहार होतील. याला सेकंडरी मार्केट व्यवहार असेही म्हणतात. या नव्या होलसेल रुपीमुळे बँका आणि वित्तीय संस्थांमधील व्यवहार अधिक सोपे आणि जलद होतील, असा दावा आरबीआयने केला आहे.

रिटेल डिजिटल रुपीची चाचणी कधीपासून सुरू?

रिटेल डिजिटल रुपीची चाचणी मागील वर्षी म्हणजेच 1 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. प्रोयोगिक तत्वावर चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होईल. डिजिटल रुपी कसा वापरायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता.