भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आज 7 जुलै रोजी वाढदिवस आहे. एम.एस धोनी इंडियन प्रिमीयर लिगमधील चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचा कर्णधार आहे. धोनीला प्रचंड फॅनफॉलोइंग असल्याने त्याची ब्रॅंड व्हॅल्यू देखील जबरदस्त आहे.
कॅप्टन कूल धोनीला भारतीय संघात आदराचे स्थान आहे. धोनीला ज्युनिअर असलेला मात्र आपल्या शैलीदार फलंदाजीने भारतीय संघात भरवशाचा फलंदाज अशी ओळख मिळवलेला विराट कोहलीचा प्रचंड चाहता वर्ग आहे. जाहिरात क्षेत्रात धोनी आणि कोहली यांचा दबदबा आहे.
धोनी आणि कोहली या दोघांनी क्रिकेटची कारकिर्द गाजवली आहे. शेकडो ब्रॅंड्सची ते जाहिरात करतात. यात विराट कोहलीची संपत्ती ही एम. एस धोनीपेक्षा अधिक असल्याचे बोलले जाते. आजच्या घडीला विराट कोहली याची एकूण संपत्ती 250 मिलियन डॉलर्स इतकी आहे. विराट हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
विराटला भारतीय क्रिकेट बोर्डाकडून मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत जाहिरात विश्वातून प्रचंड पैसा मिळतो. पुमा, ऑडी, टिसॉट सारख्या ग्लोबल ब्रॅंड्सचा विराट कोहली ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. याशिवाय विराट कोहलीची Chisel नावाची जिमची साखळी आहे. विराट आणि अनुष्का यांनी काही स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेला 42 वर्षीय महेंद्रसिंग धोनीचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. नुकताच झालेल्या आयपीएल सिझनमध्ये धोनींने बॅटमधून कमाल केली होती. धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला.
भारतीय संघात विकेटकिपर या रोलमधून त्याने पदार्पण केले होते. त्यानंतर तो कसोटी, एक दिवसीय संघ आणि ट्वेंटी ट्वेंटी संघाचा कर्णधार झाला. एम. एस धोनीकडे जवळपास 100 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. स्टार स्पोर्ट, रिबोक, टीव्हीएस मोटर्स सारख्या ब्रॅंड्सचा धोनी ब्रॅंड अॅम्बेसेडर आहे. धोनीची क्रीडा साहित्य तयार करणारी सेव्हेन नावाची कंपनी देखील आहे.