Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Khadi India Record Sales: खादी उत्पादनांची मागणी वाढली, वर्षभरात तब्बल सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल

Khadi India Record Sales: खादी उत्पादनांची मागणी वाढली, वर्षभरात तब्बल सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल

Image Source : www.retail.economictimes.indiatimes.com

Khadi India Record Sales: खादी आणि त्यासंबंधित उत्पादनाच्या मागणीत मागच्या वर्षभरात विक्रमी वाढ झाली. मिळालेल्या आकडेवारीनुसार तब्बल सव्वा लाख कोटींपेक्षा अधिक उलाढाल या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आहे.

खादीशी संबंधित उत्पादनांना (Khadi products) देशभरातून प्रचंड मागणी आहे. याचाच परिणाम म्हणून मागच्या काही वर्षांत ग्रामीण भागातल्या कारागिरांनी बनवलेल्या स्वदेशी खादी उत्पादनांच्या विक्रीत 332 टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचा व्यवसाय 31,154 कोटी रुपयांचा होता. तोच आर्थिक वर्ष 2022-23मध्ये 1,34,630 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. केव्हीआयसी (Khadi and Village Industries Commission) उत्पादनांचा व्यवसाय पहिल्यांदाच 1.34 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. तसंच केव्हीआयसीनं ग्रामीण भागात 9,54,899 नव्या नोकऱ्यादेखील (Jobs) निर्माण केल्या आहेत. एबीपी लाइव्हनं हे वृत्त दिलं.

जगातल्या सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये गणना

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, की खादी उत्पादनांची गणना जगातल्या सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये केली जाते. मागच्या काही आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या उत्पादनात 268 टक्के वाढ झाली होती. विक्रीनं सर्व विक्रम मोडीत काढत जवळपास 332 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे.

आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

2022-23 या आर्थिक वर्षात 268 टक्के वाढीसह 95,957 कोटी रुपयांवर हा व्यवसाय पोहोचला आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात खादी कपड्यांचं उत्पादन 811 कोटी रुपये होतं. त्यात 260 टक्क्यांची झेप घेऊन 2022-23 या आर्थिक वर्षात ते 2,916 कोटी रुपयांचा आकडा गाठला, जी आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. .

कोविडनंतर अधिक वाढ

खादी कपड्यांच्या मागणीतदेखील झपाट्यानं वाढ नोंदवण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात ती 5,943 कोटींवर पोहोचली आहे. कोविड-19 नंतर जगभरात अशाप्रकारच्या कपड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे खादी कपड्यांची मागणीही झपाट्यानं वाढत आहे, असं ते म्हणाले.

रोजगाराच्या संधी

खादीच्या या व्यवसायाचा केवळ आर्थिक लाभच नाही, तर रोजगारातही लाभ झाला आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात या व्यवसायाला यश मिळालं आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात 5,62,521 नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली होती. तर 2022-23 या आर्थिक वर्षात ती 70 टक्क्यांनी वाढून 9,54,899वर पोहोचली आहे. अर्थात वाढती लोकसंख्या यात महत्त्वाचा घटक आहे. नोकरकपातीच्या या काळात खादी व्यवसायात नोकऱ्यांच्या संधी एक सकारात्मक दर्शवतं.

कारागिरांच्या मानधनात वाढ

2013-14 या आर्थिक वर्षापासून त्यांच्या मानधनात 150 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर 1 एप्रिल 2023 पासून खादी कारागिरांच्या मोबदल्यात 33 टक्क्यांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. महात्मा गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली याठिकाणी केव्हीआयसीच्या प्रमुख खादी भवनच्या विक्रीनं मागचे सर्व विक्रम मोडले. येत्या काळातदेखील खादीच्या उत्पादनांमध्ये वाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास

खादीच्या उत्पादनांमध्ये केवळ कपडेच नाही, तर इतर विविध उत्पादनांचाही समावेश होतो. एक विश्वासार्हता या ब्रँडची पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहासदेखील याला लाभला आहे. तर सरकारकडून खादीच्या उत्पादनाला नेहमीच प्रोत्साहन दिलं जात असल्यानं सर्वसामान्यांमध्ये हा एक लोकप्रिय ब्रँड झाला आहे.