Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan: कर्ज महागल्याने होमलोनच्या मागणीत घट; ग्राहकांची कन्झ्युमर ड्युरेबल लोनला पसंती

Home Loan

Home Loan: वाढत्या महागाईला नियंत्रित ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो रेटमध्ये वाढ केली. त्यानंतर बँकांनी त्यांच्या व्याजदरात वाढ केली. याचा परिणाम असा झाला की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत गृहकर्जाच्या मागणीत घट झाल्याचे ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालातून समोर आले आहे.

वाढत्या महागाईला नियंत्रित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो दरात (Repo Rate) 250 बेस पॉईंट्सने वाढ केल्याचे पाहायला मिळाले. याचा थेट परिणाम असा झाला की, बँकांनी त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. मे 2022 पूर्वी गृहकर्जावर 6.5 % व्याजदर आकारला जात होता. मात्र रेपो रेट वाढल्यानंतर हा व्याजदर 8.5 % वर पोहचला आहे. गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्याने गृहकर्जाच्या वितरणात घट झाल्याचे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालातून (TransUnion CIBIL Report) समोर आले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत ही घट पाहायला मिळाली आहे.

होमलोनच्या मागणीत घट

क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ट्रान्सयुनियन सिबिलच्या अहवालानुसार (TransUnion CIBIL Report) आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत गृहकर्जाच्या वितरणात घट झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या तिमाहीत ही घट 6 % झाली असून गृहकर्जाच्या चौकशीत 1% घट झाल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये मे 2022 पासून 250 बेसिस पॉईंट्ने वाढ केल्याने बँकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली.

वैयक्तिक कर्जाकडे लोकांचा कल

गृहकर्जावरील वाढत्या व्याजदरामुळे लोकांचा दीर्घकालीन कर्ज घेण्याकडे कल कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहक गृहकर्ज घेणे टाळत आहेत. अहवालातील माहितीनुसार लोक वैयक्तिक (Personal Loan) आणि शॉट टर्म कर्जांना (Short Term Loan) प्राधान्य देत आहेत. गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक कन्झ्युमर ड्युरेबल लोन (Consumer Durable Loans) घेत आहेत. या कर्जाच्या बाबतीत असे दिसून आले आहे की, ग्राहक पहिल्या सहा महिन्यांतच हप्ता भरण्यासाठी 30 दिवसांपेक्षा जास्त विलंब करत आहेत. हे प्रमाण कोविड महामारीच्या पूर्वीच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वैयक्तिक कर्जाचे प्रमाण 26% वाढले आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 11 महिन्यात बँकांनी ग्राहकांना 4 लाख कोटी रुपयांचे वैयक्तिक कर्ज म्ह्णून दिले आहे. यामध्ये गृहकर्जाच्या समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय बँकांनी उद्योगांना 1.35 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. याशिवाय 18 ते 35 वयोगटातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्ड संदर्भात चौकशी केली होती. महत्त्वाचे म्हणजे ही चौकशी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले आहे. 

Source: navbharattimes.indiatimes.com