दिल्ली आणि हरियाणाला सुपर फास्ट कनेक्टिव्हीटीने जोडणाऱ्या दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वेवर मुसळधार पावसाने पाणी साचल्याने गुरुवारी हा मार्ग ठप्प झाला होता. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या प्रोजेक्टमधील कच्चे दुवे दिसून आले. मुसळधार पावसाने हरियाणामधील एक्सप्रेस वेवरची वाहतूक ठप्प झाली. वाहनधारकांना आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
तब्बल 15 वर्ष आणि 9000 कोटी खर्च करुन दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वे तयार करण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसाने या महामार्गावर दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून आहे.पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने महामार्गाला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते. यामुळे गुरुवारी एक्सप्रेसवे वरची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली होती.
हरियाणा, गुडगाव, वझिराबाद या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. गुरुवारी गुडगावमध्ये 54 मिमी पाऊस झाला. वझिराबादमध्ये 60 मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी झालेल्या प्रचंड पावसाने हरियाणामधील दिल्ली-गुडगाव एक्सप्रेसवेवर पुराचे पाणी आले. जवळपास दोन ते तीन फूट पाणी महामार्गावर साचले होते. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
15 वर्ष लागली पूर्ण व्हायला
हरियाणा सरकारने 2006 मध्ये दिल्ली गुडगाव एक्सप्रेस वे चा आराखडा तयार केला होता. हा एक्सप्रेस वे चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार होता. त्यातील दोन टप्पे दिल्लीच्या दिशेने होते. दोन टप्पे हरियाणामध्ये होते. मात्र दिल्ली आणि हरियाणा सरकारमध्ये जमीन अधिग्रहणाबाबत मतभेद असल्याने हा प्रकल्प रखडला. यामुळे प्रकल्पाची मूळ किंमत प्रचंड वाढली. अखेर नोव्हेंबर 2019 मध्ये हरियाणाकडील एक्सप्रेस वेचे काम पूर्ण झाले. दिल्लीकडील महामार्गाचे काम सप्टेंबर 2020 मध्ये पूर्ण झाले आणि एक्सप्रेस वे सुरु झाला. यासाठी तब्बल 9,000 कोटींचा खर्च झाला.
कनेक्टिव्हीटी वाढली
द्वारका, वसंत कुंज या दक्षिण दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वेने चांगली कनेक्टिव्हीटी मिळाली. दररोज सरासरी तीन लाख प्रवाशी दिल्ली गुडगाव एक्सप्रेस वेने प्रवास करतात. दररोज सरासरी 3 लाख वाहने या एक्सप्रेसचा वापर करतात. यात प्रत्येक वर्षी 7% ते 10% वाढ होते.
असा आहे दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वे
दिल्ली आणि गुडगाव या दोन शहरांना जोडणारा हा एक्सप्रेस वे जवळपास 28 किमी लांबीचा आहे. एक्सप्रेसवेचा बहुतांश भाग सहा मार्गिकेचा असून काही ठिकाणी तो आठ मार्गिकेाचा आहे. दिल्ली-गुडगाव एक्सप्रेस वेवर मिलेनियम सिटी एक्सप्रेस वे प्रा. लि.( MCEPL) या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रोजक्ट्ससाठी कर्ज देणाऱ्या बँकांच्या समूहाने ही कंपनी स्थापन केली आहे. वर्ष 2023 पर्यंत ही कंपनी टोल वसूल करणार आहे. या एक्सप्रेस वे वर खेरकी धौला टोल प्लाझा आणि IGI टोल प्लाझा येथे वाहनांना टोल द्यावा लागतो. एप्रिल 2022 पासून येथील टोलचा दर 10% ते 15% ने वाढवण्यात आला होता.