ऑनलाईन खरेदी ही आता साधारण बाब बनली आहे. बेडशीट, घराचे पडदे, किराण्याचं सामान ते हिरव्या पाजेभाल्या देखील आता ऑनलाईन मिळू लागल्या आहेत. थेट घरापर्यंत डिलिव्हरी येत असल्यामुळे सामान्य लोकांची ऑनलाईन खरेदीला पसंती वाढताना दिसते आहे. अॅमेझॉन हे त्यापैकी एक पॉप्युलर असं नाव. ई-कॉमर्स वेबसाईट म्हणून बहुतांश ग्राहक अमेझॉनला पसंती देतात. मात्र जसजसे अमेझॉनच्या ग्राहक संख्येत वाढ होत गेली तसतशी डिलिव्हरीच्या बाबतीत लोकांना नकारात्मक अनुभव यायला लागला. ऑर्डर केलेल्या वस्तू वेळेवर न मिळणे, आपोआप ऑर्डर रद्द होणे आणि डिफेक्टिव्ह माल मिळणे अशा अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. Amazon च्या ट्विटर खात्यावर तर रोज लाखोंनी तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत.
यावर उपाय म्हणून आता लॉजिस्टिकमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय अॅमेझॉनने घेतलाय. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना सुस्थितीत त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तू मिळाव्यात यासाठी कंपनी त्यांच्या गोदामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या तयारीत आहे.होय, आता थेट गोदामांमध्ये एआय चा (Artificial Intelligence) वापर अॅमेझॉन करणार आहे.
पॅकिंगमध्ये गुणवत्ता आणणार
ग्राहकांनी अॅमेझॉनवरून ऑर्डर केल्यानंतर वितरक कंपनीकडून अॅमेझॉन घेते आणि त्यावर पॅकेजिंग करून ग्राहकांपर्यंत त्यांच्या वस्तू पोहोचवते. अकुशल कामगार किंवा कामगारांच्या कमतरतेमुळे पॅकिंग व्यवस्थित होत नाही किंवा त्याची देखभाल सुयोग्यरित्या घेतली जात नाही. बहुतेकदा यामुळे डिलिव्हरी दरम्यान वस्तू तुटण्याच्या, फुटण्याच्या किंवा खराब प्रकरणांमध्ये वाढ झाली होती.
यावर उपाय म्हणून आता अॅमेझॉनच्या गोदामांमध्ये एआय वापरले जाणार आहे. वस्तू सुस्थितीत आहेत किंवा नाही हे आता एआय तपासणार आहे. वस्तू जर डिफेक्टिव्ह असतील तर त्या रिजेक्ट केल्या जातील आणि ग्राहकांचा मनस्ताप वाचेल.
कर्मचारी कपातीची भीती
भारतीय गोदामांमध्ये बहुतेकदा अकुशल कामगार असतात. कष्टाची कामे करणारे बहुतांश लोक हे अल्पशिक्षित असतात त्यामुळे त्यांची तंत्रज्ञानाची समज देखील कमी असते. एआय च्या वापरामुळे पॅकेजिंगचे काम सुलभ होणार असले तरी सामान्य कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात येऊ शकतात. प्राथमिक टप्प्यात अमेरिकेत हा एआय चा प्रयोग केला जाणार असून इतर देशांमध्ये देखील टप्प्या टप्प्याने एआय चा वापर वाढवला जाणार असे जाणकारांचे म्हणणे आहे.