Cyber Crime Safety Tips: जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असेल किंवा पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. नाही तर तुम्ही सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरू शकता. सध्या सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे. सध्या या गुन्हेगारांनी अल्पबचत योजनांच्या खात्याकडे लक्ष्य वळवल्याचे दिसून येते. त्यात सरकारने नुकतीच पोस्टाच्या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे अशी बचत योजनांची खाती सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहेत.
Table of contents [Show]
गुंतवणूकदारांना गुन्हेगार कसे टार्गेट करतात?
सायबर गुन्हेगार प्रामुख्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करतात. आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपडेट न केल्यामुळे त्यांचे खाते बंद होण्याची भीती हे गुन्हेगार गुंतवणूकदारांना दाखवतात. लोकांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेऊन हे सायबर गुन्हेगार गोपनीय माहिती मिळवतात आणि खात्यातील रक्कम घेऊन लंपास होतात.
‘विशिंग’द्वारे केली जाते फसवणूक
सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात, ज्यात तुम्हाला कॉल करणे, मेसेज करणे, तुम्हाला धमकावणे, मालवेअर लिंक पाठवणे यांचा समावेश होतो. जेव्हा फसवणूक करणारे तुमची फसवणूक करण्यासाठी कॉल करतात तेव्हा या पद्धतीला ‘विशिंग’ असे म्हणतात. फसवणूक करणारे तुम्हाला बँकेच्या प्रतिनिधीच्या भूमिकेत किंवा तत्सम भूमिकेत संवाद साधून तुमची माहिती मिळवतात. ते तुम्हाला फ्री क्रेडिट कार्ड, टॅक्स रिफंड, क्रेडिट कार्ड रिवॉर्ड इत्यादीच्या बहाण्याने कॉल करतात आणि जर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकून तुमची माहिती शेअर केली तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
सायबर गुन्हेगारांपासून दूर राहण्यासाठी प्रथम वैयक्तिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. एसएमएस आणि ईमेलवर प्राप्त झालेल्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. तुमच्या बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका. कोणत्याही संशयास्पद कॉल, संदेश किंवा मेलला उत्तर देऊ नका. त्यांना ब्लॉक करा. कोट्यवधी रुपयांची लॉटरी जिंकण्यासोबतच हे गुंड तुम्हाला गुंतवणुकीवर भरघोस नफ्याचे आमिष दाखवून तुमच्याकडून पैशांची मागणीही करू शकतात. त्यामुळे लोभामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू नका.
फसवणुकीची ऑनलाईन तक्रार अशी करा?
जर तुम्ही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला असेल तर सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करणे गरजेचे आहे. www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता. याशिवाय 1930 नंबरवर कॉल करून ऑनलाईन फसवणुकीची तक्रार करू शकता.