देशातील गरीब-श्रीमंतांमधील दरी वाढत असल्याचं दिसून येत आहे. गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर संकलन मंडळाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. कोरोनानंतर देशातील कोट्यधीश (वैयक्तिक) करदात्यांची संख्या 51 टक्क्यांनी वाढली आहे. मागील तीन वर्षात ही संख्या झपाट्याने वाढली.
कोरोनानंतर नोकरकपात, उद्योग व्यवसायातील मंदी, भाववाढ अशा परिस्थितीतही 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील तीन वर्षात कोट्यधीश करदात्यांची संख्या 57,951 हजारांनी वाढली आहे. तसेच यात दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे.
कोरोनापूर्वी म्हणजेच 2019-20 साली 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्यांची संख्या 1,11,939 इतकी होती. त्यात आता तीन वर्षानंतर वाढ होऊन 1,69,890 इतकी झाली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्ससने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2022-23 वर्षात श्रीमंतांच्या संख्येत 51% वाढ दिसून आली.
श्रीमंतांची संख्या कधी कमी झाली होती?
2020-21 साली जेव्हा देशभर कोरोनाचा प्रसार झाला होता तेव्हा 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 81,653 हजारापर्यंत खाली आली होती. सततच्या लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे श्रीमंतांच्या उत्पन्नात घट झाली होती. एवढा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी कोट्यधीशांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.
श्रीमंतांची संख्या वाढण्यामागील कारणे काय?
दरम्यान, आयकर विभाग पूर्वीपेक्षा जास्त सतर्क झाला आहे. करदात्यांच्या उत्पन्नांची माहिती आयकर विभागाला सहज मिळत आहे. सोबतच स्टार्टअप कंपन्या, शेअर मार्केटमधील कोरोनानंतरची तेजी, चांगला पगार देणाऱ्या वरिष्ठ पदावरील नोकऱ्यांची वाढलेली संख्या ही कारणे श्रीमंतांची संख्या वाढण्यामागे असू शकतात.
कोट्यधीश वैयक्तिक करदात्यांपैकी नोकरदार आणि बिगर नोकरदार अशी वेगळी यादी आयकर विभागाकडून जाहीर केली जात नाही. मात्र, एकूण वैयक्तिक कोट्यधीशांपैकी निम्म्यापेक्षा जास्त व्यक्ती वैयक्तिक करदाते असल्याचे बोलले जात आहे.