Credit Report Error: बँक किंवा कोणत्याही वित्तसंस्थेसोबत आर्थिक व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा ठरतो. कर्ज देण्यापूर्वी बँक तुमची क्रेडिट हिस्ट्री खोलात जाऊन तपासते. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तरच तुम्हाला कर्ज दिलं जाते, अन्यथा बँक कर्ज नाकारते. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
कार्ड पेमेंट, कर्जाचे हफ्ते विविध बिल पेमेंट वेळेवर करायला हवीत. बऱ्याच वेळा तुम्ही सर्व व्यवहार चोख करत असता तरीही तुम्ही अडचणीत येऊ शकता. क्रेडिट स्कोअर रिपोर्टमध्ये जर काही चूक असेल तर तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो.
क्रेडिट रिपोर्टमधील चुकीचे काय परिणाम होऊ शकतात?
क्रेडिट रिपोर्ट नीट तपासून पाहायला हवा. तुमचे एखाद्या बँकेत खाते नसतानाही ते खाते तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसू शकते. तसेच कर्ज, क्रेडिट कार्ड, EMI हे सुद्धा चुकीने तुमच्या खात्यावर दिसू शकतात. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसत असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. तुम्ही जरी आर्थिक व्यवहार चोख ठेवत असाल तरी चुकीने लिंक झालेल्या खात्यावरील व्यवहारात काही घोळ असेल तर तुम्हाला फटका बसेल.
क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चूक कशी सुधाराल?
TransUnion CIBIL, Equifax, Experian, CRIF Highmark हे चार प्रमुख क्रेडिट ब्युरो भारतात आहेत. यांना रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे. ज्या क्रेडिट ब्युरोकडून तुम्ही रिपोर्ट घेतला आहे त्या क्रेडिट ब्युरोकडे तुम्हाला तक्रार करावी लागेल. तुम्हाला आधी क्रेडिट रिपोर्ट ब्युरोच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागू शकते. जी काही चुकीची माहिती तुमच्या रिपोर्टमध्ये दिसत आहे त्याची डिटेल्स तुम्हाला तक्रारीत द्यावी लागेल. तसेच तुमचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक इ माहिती द्यावी लागेल. क्रेडिट ब्युरोच्या संकेतस्थळावरुन तुम्ही ऑनलाइन तक्रारही दाखल करू शकता. मेलद्वारेही तक्रार दाखल करता येईल.
कोणती कागदपत्रे जमा करावी लागतील?
तक्रारीच्या प्रकारानुसार तुम्हाला बँक स्टेटमेंट, पेमेंट रिसिप्ट किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील. तुम्ही ज्या वित्तसंस्थेकडून कर्ज घेतले असेल किंवा आर्थिक व्यवहार केला असेल त्यामध्ये चूक असेल तर त्यासंबंधित कागदपत्रे तक्रार दाखल करताना सोबत जोडा. ज्या वित्तसंस्थेने तुमची चुकीची माहिती क्रेडिट रिपोर्ट ब्युरोकडे जमा केली आहे त्या संस्थेकडेही तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
ग्राहकांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती वित्तसंस्था क्रेडिट ब्युरोला देत असतात. त्यामुळे क्रेडिट ब्युरो स्वत: चूक दुरूस्त करत नाही. ही माहिती त्या वित्तसंस्थेकडे पाठवली जाते. वित्तसंस्थेकडून परवानगी मिळाल्यानंतरच ही चूक दुरूस्त होते. त्यामुळे तुम्ही ज्या वित्तसंस्थेसोबत आर्थिक व्यवहार केला असेल त्यांच्याकडे तक्रार नोंदवा. सोशल मीडियावरील वित्तसंस्थांच्या अधिकृत अकाऊंटवर थेट मेसेज पाठवूनही तुम्ही तक्रारीची माहिती देऊ शकता.