ज्या बँकेत तुमचे खाते असेल तर त्या बँकेतून क्रेडीट कार्ड सहजपणे मिळू शकते. त्यातही तुमचे सॅलरी अकाउंट असल्यास तुमच्या सॅलरीनुसार बँकेकडून तुम्हाला क्रेडीट कार्ड ऑफर केले जाते. मात्र तुम्ही जर पहिल्यांदाच क्रेडीट कार्ड घेणार असाल तर काही महत्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
कॅश, मोबाईल वॉलेटसारखे पर्याय असले तरी क्रेडीट कार्डचे एक वेगळेच महत्व आहे. क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे.क्रेडीट कार्डधारकांना कॅशबॅक, इन्स्टंट डिस्काउंटसारख्या ऑफर्स मिळतात. पैशांची तातडीची गरज तुमच्या वॉलेटमधील क्रेडीट कार्ड भागवू शकते. यासाठी 45 दिवस विनाव्याज पैसे तात्काळ उपलब्ध होतात. क्रेडीट कार्डचा योग्य वापर करुन पैशांची परतफेड निर्धारित वेळेत केली तर तुमचा सिबिल स्कोअर सुधारण्यास मदत होते.
सध्या बाजारात बँकांकडून क्रेडीट कार्डच्या शेकडो ऑफर्स उपलब्ध आहेत. काही को ब्रॅंडेड क्रेडीट कार्ड आहेत. काहींना वार्षिक शुल्क माफ आहे तर काही कार्ड विशिष्ट शॉपिंगच्या उद्देशाने तयार केली आहेत. मात्र तुमच्या गरजेनुसार नेमके क्रेडीट कार्ड निवडणे आवश्यक आहे. काही महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवले तर तुम्हाला योग्य क्रेडीट कार्ड निवडणे सोपे जाईल.
क्रेडीट कार्डने तुमची पत वाढणार असली तरी त्या कार्डने खर्च केलेली रक्कम निर्धारित वेळेत परत केली नाही तर तुमचा सिबिल खराब होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही क्रेडीट कार्डने खर्च करता तेव्हा ते पैसे वेळेत परत करण्याबाबत जागरुक असायला हवे.
खासकरुन तुमच्या सर्वच गरजा पूर्ण करेल, असे क्रेडीट कार्ड मिळणे अवघड आहे. त्यामुळे तुमच्या खरेदीचा पॅटर्न काय आणि तुम्हाला किती पैशांची गरज भासते हे मुद्दे लक्षात घेऊन क्रेडीट कार्ड निवडणे सोपे जाईल.
कोणत्या कारणासाठी क्रेडीट कार्ड हवंय
तुम्हाला कोणत्या कारणासाठी क्रेडीट कार्ड हवयं याचा विचार करायला हवा.तुम्ही दर महिन्याला शॉपिंग करता का, तुम्ही कामाच्या निमित्ताने नेहमी विमान प्रवास करत असाल तर एअरपोर्टवर लाऊंज सेवा, तिकिटांवर सवलतीसाठी तुम्हाला क्रेडीट कार्ड फायदेशीर ठरेल. विमान कंपन्या क्रेडीट कार्डने तिकिट बुक केल्यास रिवार्ड पॉईंट्स किंवा एअरलाईन्स माईल्स देतात. त्याचा फायदा होतो. दर आठवड्याला हॉटेलिंग करणार असाल तर क्रेडीट कार्ड तुम्हाला बचत करुन देऊ शकते.
क्रेडीट कार्ड चार्जेस
क्रेडीट कार्डला वार्षिक शुल्क लागू होते. मात्र अनेक बँकांकडून वार्षिक शुल्क सुरुवातीला माफ केले जाते. सध्या बाजारात शेकडो क्रेडीट कार्ड ऑफर्स उपलब्ध आहेत. यात काही लाईफटाईम फ्रि चार्ज तर काहींचा वार्षिक चार्ज आहे. मोठ्या रकमेच्या प्रीमियम कार्ड्सला 10000 पासून वार्षिक शुल्क सुरु होते. मात्र त्यात वर्षाला ठराविक रक्कम खर्च केली तर क्रेडीट कार्डचे वार्षिक शुल्क माफ केले जाते. त्यामुळे अशा ऑफर्स नीट तपासून पाहणे आवश्यक आहे. सॅलरी अकाउंट होल्डर्ससाठी बहुतांश बँकांकडून बेसिक लिमीट असलेले क्रेडीट कार्ड इश्यू केले जाते. ज्याचे वार्षिक शुल्क माफ असते किंवा लाईफटाईम फ्री असते.
कोणत्या बँकेचे क्रेडीट कार्ड घेऊ
सर्वसाधारपणे तुमचे ज्या बँकेत खाते असेल तिथले क्रेडीट कार्ड डिपार्टमेंट तुम्हाला क्रेडीट कार्डची ऑफर्स देतात. सेव्हिंग अकाउंट असल्यास खातेदार बँकेकडे क्रेडीट कार्डबाबत चौकशी करु शकतो. याशिवाय बँकांच्या अॅपवरुन देखील तुम्ही क्रेडीट कार्डसाठी अप्लाय करु शकता.पैसाबझार, बँकबझार सारख्या वेबसाईटवर क्रेडीट कार्डची तुलना करणे शक्य आहे. यात बँकांच्या विविध ऑफर्स, चार्जेस यांचा तपशिल मिळेल.