Costliest Medical Degree: वैद्यकीय शिक्षणाचा खर्च एकूण तुमच्या अंगावर काटा उभा राहील. त्यामुळे सरकारी कॉलेजात अॅडमिशन व्हावे म्हणून विद्यार्थी नीट परीक्षेची जीव तोडून तयारी करत असतात. मात्र, सगळ्यांनाच सरकारी कॉलेजात प्रवेश मिळत नाही. मग खासगी कॉलेजांकडे विद्यार्थ्यांना मोर्चा वळवावा लागतो. मात्र, काही कॉलेजमधील MBBS चा खर्च कोटींच्या घरात गेला आहे.
सर्वात महागडे कॉलेज कोणते?
नवी मुंबईतील डी. वाय पाटील मेडिलक कॉलेज हे देशातील सर्वाधिक महागडे मेडिकल कॉलेज असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने केलेल्या अहवालात म्हटले आहे. या कॉलेजची प्रथम वर्षाच्या MBBS कोर्सची फी 30 लाख 50 हजार रुपये आहे. साडेचार वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला 1 कोटी 35 लाख रुपये लागतील. हे शुल्क सोडून वन टाइम युनिव्हर्सिटी फी 2.84 लाखही विद्यार्थ्याला भरावी लागते.
साडेचार वर्षांचा खर्च कोटीमध्ये
डी. वाय पाटीलच्या पुण्यातील कॅम्पसमध्ये MBBS च्या एका वर्षासाठी 29.5 लाख रुपये फी आहे. त्याखालोखाल भारती विद्यापीठ कॉलेज MBBS साठी 26.84 लाख रुपये फी घेते. ही काही ठराविक कॉलेज आहे. वैद्यकीय शिक्षण देणारी देशभरातील अनेक अभिमत (डिम्ड) विद्यापीठे 25 लाखांपेक्षा जास्त फी एका वर्षासाठी घेतात.
तामिळनाडू राज्यातही सर्वाधिक महागडे कॉलेजेस आहेत, असे अहवालात म्हटले आहे. चेन्नईतील श्री रामचंद्र कॉलेजची एका वर्षाची फी 28.1 लाख रुपये आहे. तर चेन्नईतील दुसऱ्या एका एस.आर.एम कॉलेजची एका वर्षाची फी 27.2 लाख रुपये आहे.
कॉलेज फी सोबत इतरही शुल्क विद्यार्थ्यांकडून वसूल
प्रत्येक वर्षाच्या शुल्कामध्ये ट्युशन फी आणि होस्टेल फीचा समावेश असतो. काही कॉलेज इतरही शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतात. विद्यापीठ शुल्क, अनामत रक्कमसह इतरही शुल्काच्या स्वरुपात लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून घेतात. काही महाविद्यालयात दरवर्षी काही टक्क्यांनी ट्युशन फी वाढते. तसेच होस्टेलमधील सुविधा बंधनकारक असतात. म्हणजे त्यासाठी इच्छा नसतानाही फी द्यावी लागते.
सरकारी कॉलेजची शुल्क अंदाजे किती?
सरकारी कॉलजेमध्ये अॅडमिशन झाल्यास विद्यार्थ्याला एका वर्षासाठी सुमारे 50 हजार रुपये फी आहे. दरम्यान, खासगी कॉलेज सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. एजंटद्वारे पैसे भरून अॅडमिशन घेण्यासाठीही अनेक विद्यार्थी प्रयत्न करतात. मात्र, त्यातून फसवणुकीचे प्रकार घडतात. उत्तर भारतातील वैद्यकीय कॉलेजेस तुलनेने स्वस्त आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.