Medical Inflation: रुग्णालयातील उपचाराच्या खर्चाने जनता हवालदिल झाली आहे. मागील 5 वर्षात उपचाराचा खर्च दुपटीने वाढला आहे. विशेषत: कोरोनानंतर औषधे, हॉस्पिटलाइझेशन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विमा दाव्यांच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी वैद्यकीय सुविधा महागल्याचे दिसून येत आहे. तसेच आणीबाणीच्या काळात रुग्णालयाच खर्च भागवण्यासाठी आरोग्य विम्याची किती आवश्यक आहे, हे सुद्धा दिसून येत आहे.
संसर्गजन्य आजारांवरील खर्च वाढला
संसर्गजन्य आजार, साथीचे आजार, श्वसनासंबंधी आजारांच्या उपचाराचा खर्च तर वैद्यकीय क्षेत्रातील महागाईपेक्षा वेगाने वाढत आहे. (Medical Inflation In India) किरकोळ महागाई दरापेक्षा जास्त म्हणजे 14 टक्के दराने या आजारांवरील खर्च दरवर्षी वाढत आहे.
उपचाराचा खर्च मेट्रो शहरात सर्वाधिक
2018 साली संसर्गजन्य आजारासाठी सरासरी आरोग्य विमा दाव्याची (क्लेम) रक्कम 24,569 रुपये होती. ती वाढून 2022 साली 64,135 रुपयांवर पोहचली. ही वाढ वार्षिक 160% टक्क्यांची आहे. पॉलीस बझार या विमा अॅग्रिगेटर कंपनीच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरात तर ही रक्कम सर्वाधिक आहे. 2018 साली सरासरी विम्याचा दावा 30 हजार रुपये होता. तो आता 80 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
श्वसनासंबंधी आजाराचा खर्च किती रुपयांनी वाढला?
श्वसनासंबंधी आजारांचा सरासरी क्लेम 2018 साली 48,452 रुपये होता. (Medical Inflation In India) तो वाढून 2022 साली 94,245 रुपये झाला आहे. वार्षिक वाढीचा दर सुमारे 26 टक्क्यांच्या आसपास आहे. तर मुंबई शहरातील खर्च मागील पाच वर्षात 80 हजार रुपयांवरून 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहचला आहे. कोरोनाकाळात आणि त्यानंतरही श्वसनासंबंधी आजारांचा खर्च सर्वाधिक वाढला आहे.
वैद्यकीय वापराच्या वस्तुंचा खर्चही वाढला
रुग्ण उपचारासाठी भरती झाल्यानंतर वापरल्यानंतर खराब होणाऱ्या टाकाऊ वैद्यकीय वस्तू (कनझ्युमेबल) जसे की, मास्क, हातमोजे, सर्जिकल वस्तूंवरील खर्चही वाढली आहे. कन्झ्युमेबल वस्तुंवरील खर्च पूर्वी फक्त 3-4% होता. तो वाढून आता 15% झाला आहे, असे पॉलिसी बझारचे व्यवसाय अधिकारी अमित छाबरा यांनी सांगितले.