Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Medicine Strip: मेडिकलमधून खरेदी करता येणार हव्या तितक्याच गोळ्या, संपूर्ण स्ट्रिप खरेदीची गरज नाही!

Medicine Strip

Image Source : www.theaustralian.com

National Consumer Helpline वर टॅब्लेट किंवा कॅप्सूलची संपूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याचा आग्रह केमिस्ट करत असल्याच्या असंख्य तक्रारी देशभरातून येत आहेत. ग्राहकांचे नुकसान होऊ नये आणि केमिस्ट देखील आश्वस्त राहतील असा तोडगा काढण्याठी सरकार सध्या प्रयत्नशील आहे. यावर प्राथमिक स्वरूपात काही पर्याय उपलब्ध असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे...

बऱ्याच वेळा आपण मेडिकलमध्ये जातो. साधी सर्दी, ताप, खोकल्याची गोळी/टॅब्लेट आपल्याला घ्यायची असते. एक किंवा दोन टॅब्लेट च आपल्याला हव्या असतात. आपण मेडिकलवाल्याकडे दोन टॅब्लेट देण्याची विनंती करतो, मात्र मेडिकलवाला सुट्ट्या टॅब्लेट देण्यास मनाई करतो आणि आपल्याला गरज नसताना संपूर्ण औषधाची स्ट्रिप खरेदी करावी लागते. म्हणजेच जे काम साधारणतः 5-10 रुपयांत होणार असते, त्यासाठी तुम्हाला 50 ते 100 रुपये विनाकारण खरेदी करावे लागतात. खरेदी केलेल्या टॅब्लेट पैकी बऱ्याच औषधाच्या टॅब्लेट नंतर फेकण्यात जातात. असं तुम्हा-आम्हा सर्वांसोबतच कधी ना कधी घडलं असेलच.

एक्सपायरी डेटचं दिलं जातं कारण 

जवळपास सर्वच औषधांच्या स्ट्रिपवर तळभागात औषधाची एक्सपायरी डेट (Expiry Date) लिहिलेली असते. जर कुणा ग्राहकाला त्या स्ट्रिपमधील एखाद-दुसरी गोळी दिली तर त्यावर सदर औषधाची एक्सपायरी डेट लिहिलेली नसते. त्यामुळे जर गोळ्या खाल्ल्यानंतर कुणा रुग्णाला अस्वस्थ जाणवू लागले तर थेट केमिस्टला जबाबदार धरल्याची काही प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केमिस्ट संघटनांनी अख्खीच्या अख्खी स्ट्रिप विकण्याचा पर्याय निवडला होता. यामुळे सामान्य नागरिकांना मात्र भुर्दंड दिला जात होता.

केमिस्ट ग्राहकांना संपूर्ण स्ट्रिप विकत घेण्याचा आग्रह करतात त्याचे दुसरे आणखी एक कारण म्हणजे औषध वितरक किंवा फार्मास्युटिकल कंपन्या स्ट्रिप कापलेली असल्यास उरलेली औषधे परत घेण्यास नकार देतात, त्याचे आर्थिक नुकसान केमिस्टलाच सहन करावे लागते.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस 

ग्राहक व्यवहार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणार्‍या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर (National Consumer Helpline) टॅब्लेट किंवा कॅप्सूलची संपूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याचा आग्रह केमिस्ट करत असल्याच्या असंख्य तक्रारी देशभरातून येत आहेत. ग्राहकांचे नुकसान होऊ नये आणि केमिस्ट देखील आश्वस्त राहतील असा तोडगा काढण्याठी सरकार सध्या प्रयत्नशील आहे. यावर प्राथमिक स्वरूपात काही पर्याय उपलब्ध असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे, त्यावर सरकार सध्या काम करत आहे. सरकारने याबाबत औषधे बनवणाऱ्या कंपन्यांशी चर्चा सुरू केली असून येत्या काळात त्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो.

औषधांच्या पॅकिंगसाठी नवीन तंत्रज्ञान

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नुकतीच फार्मा उद्योगातील दिग्गजांशी याबाबत चर्चा केली आहे. या बैठकीत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे उच्चपदस्थ अधिकारीही सहभागी झाले होते. सदर बैठकीत मंत्रालयाने सुचवले आहे की औषधांच्या पॅकेजिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेता येऊ शकतो, त्यावर सध्या गांभीर्याने विचार सुरु आहे. तसे झाल्यास यापुढे प्रत्येक गोळीवर औषधाची संपूर्ण माहिती देणारा QR कोड चिन्हांकित केला जाईल, ज्यातून औषधाची एक्सपायरी डेट, निर्मिती, त्यात समाविष्ट असलेले ड्रग्ज आणि त्याची मात्रा ही संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकेल.

औषधाची संपूर्ण स्ट्रिप किंवा पट्टी जबरदस्तीने खरेदी केल्याने केवळ वैद्यकीय औषधांची नासाडी होत नाही तर ग्राहकांवर देखील अनावश्यक आर्थिक बोजा पडतो, असे मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.