cognizant layoffs: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Cognizant मंदीच्या गर्तेत सापडली असून साडेतीन हजार कर्मचारी कपात करणार आहे. याआधीही कंपनीने पहिल्या टप्प्यात कर्मचारी कपात केली होती. आणखी खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा दुसरा टप्पा आता सुरू केला आहे. सोबतच 2023 आर्थिक वर्षात नफा कमी होईल असे स्वत: कंपनीनेच म्हटले आहे.
दुसऱ्या टप्प्यात कर्मचारी कपातीबरोबरच स्थावर मालमत्तेवरील खर्च कमी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतातील विविध कार्यालयातील 1 कोटी स्केअर फूटपेक्षा जास्त जागेवरील कार्यालये बंद करून खर्च कमी करणार आहे.
अमेरिकेतील मंदीचा फटका
कॉग्निझंट ही अमेरिकास्थित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. मात्र, त्यांचे सर्वाधिक कामकाज भारतातून चालते. कॉग्निझंटचे अनेक ग्राहक अमेरिकेतील आहेत. मात्र, सध्या अमेरिकेत मंदीसदृश्य परिस्थिती असल्याने कंपनीकडील कामाचा ओघ कमी झाला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर देखील झाला. नुकतेच रवी कुमार यांची सीईओपदी निवड केली आहे. कॉग्निझंटला पुन्हा नफ्यात आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी खर्च कपातीला त्यांनी प्राधान्य दिल्याचे त्यांच्या निर्णयातून दिसते.
कॉग्निझंट कंपनीची सुमार कामगिरी
टेक महिंद्रा, इन्फोसिस, अॅसेन्चर या कॉग्निझंटच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. प्रतिस्पर्धी कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आहेत. मात्र, कॉग्निझंट नफा कमावण्याच्या स्पर्धेत मागे पडली. तसेच अनेक मोठे ग्राहकही कंपनीच्या हातून गेले. मागील एक वर्षात कॉग्निझंटचा नफा कमी राहीला. सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर रवी कुमार यांनी तब्बल 100 पेक्षा जास्त ग्राहकांच्या भेटी घेतल्या. त्यातून कंपनीला काही नवी कंत्राटे मिळाली. मात्र, इतर कंपन्यांशी तुलना करता अपक्षेप्रमाणे फायदा झाला नाही.
खर्च कमी करण्यासाठी NextGen program लाँच
कंपनीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी सीईओ रवी कुमार यांनी मागील तिमाहीत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला. खर्च कमी करण्यासाठी कॉग्निझंटने NextGen program लाँच केला. त्याअंतर्गत साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येईल. त्यांची प्रतिस्पर्धी अॅसेन्चर कंपनीनेही 19 हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांवर लेऑफ बेनिफिटअंतर्गत कंपनी 200 मिलियन डॉलर खर्च करणार आहे. स्थावर मालमत्तेवरील खर्च 100 मिलियन डॉलर कमी करणार आहे. याद्वारे काही कार्यालयांना टाळे लावले जातील. भाडेतत्त्वावरील कार्यालये सुद्धा बंद करण्याचा विचार कंपनी करत आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मंदीचा परिणाम
कोरोना साथ ओसरल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा नफा कमालीचा रोडावला. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉनसह अनेक आघाडीच्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. कोरोनाकाळात सेवांची मागणी वाढली होती. मात्र, आता पुन्हा सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर कंपन्यांचा नफा रोडावला. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. स्टार्टअप कंपन्यांना तर जास्त फटका बसला. निधी उभारण्यात स्टार्टअप कंपन्यांना अडचणी आल्या सोबतच कर्मचारी कपातही करावी लागली.