एरव्ही लष्करी सामर्थ्याच्या जोरावर आशिया खंडात दादागिरी करणाऱ्या चीनला कोरोनानंतर आता बँकिंग क्षेत्रातील अभूतपूर्व संकटाने चांगलेच ग्रासले आहे. बुडीत कर्जांनी बँकांची हालत नाजूक केली आहे. काही बँका अक्षरश: बुडण्याच्या उंबरठयावर आहेत. चीनमधील जवळपास सर्वच बँकांनी तेथील लोकांना पैसे काढण्यापासून मज्जाव केला आहे. हे कमी की काय तर बँकांना सुरक्षा देण्यासाठी चीनी सरकारने चक्क लष्कराची मदत घेतली आहे. वाढता जनक्षोभ रोखण्यासाठी बँकांबाहरे रणगाडे आणि लष्कराचा प्रचंड फौजफाटा असं चित्र चीनमधील प्रमुख शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. हळुहळू हे लोण संबंध चीनमध्ये पसरत आहे. चीनी बँका कोलमडणे म्हणजे जागतिक महामंदीची लक्षणे असल्याचे बोलले जात आहे.
चीनमध्ये मागील आठवड्याभरापासून बँकिंग क्षेत्रात प्रचंड उलथापालथ दिसून आली आहे. बँकांमधून पैसे काढण्यासाठी चीनी ठेवीदार हजारोंच्या संख्येने आंदोलने करत आहेत. वाढती बुडीत कर्जे (NPA) आणि लोन डिफॉल्टर्स अर्थात कर्ज बुडवणाऱ्यांची वाढती संख्येने तेथील बँकांना पुरते हतबल केले आहे. गृह कर्जदारांनी कर्जाची परत फेड थांबवली आहे. पैशांचा खडखडाट होऊ नये, यासाठी बँकांनीच ठेवीदार आणि खातेदारांना पैसे काढण्यापासून प्रतिबंध केला आहे. चीनमधीन बँकिंग व्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचली आहे. ज्याचे दूरगामी परिणाम चीनसह जागतिक अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील.
चीनमध्ये बँकांप्रमाणेच छोट्या फायनान्शिअल इन्स्टिट्यूट प्रचंड संकटात सापडल्या आहेत. कोरोनाचे संकट, बेरोजगारी, रिअल इस्टेट आणि संबधित क्षेत्रातील मंदी, त्यातून झालेले लोन डिफॉल्ट यामुळे बँकिंग यंत्रणाच खिळखिळी बनली आहे. त्यातच बँकांनी सावध पवित्रा घेत ठेवीदारांना पैसे काढण्यास मज्जाव केल्यानं चीनी नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बँकांवरील विश्वास उडाला असून लोक बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत.
हेनन प्रातांतील चार बँकांनी 18 एप्रिल 2022 पासून ग्राहकांची खाती गोठवली आहेत. पैसे काढण्यास मज्जाव केल्याने ठेवीदार आणि खातेदारांनी बँकांबाहेर आंदोलने केली. या चारही बँकांमध्ये तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सच्या एकत्रित ठेवी आहेत. दरम्यान, सुरुवातीला या बँकांनी ठेवीदारांना पैसे काढण्यापासून थोपवण्यासाठी अंतर्गत कामाचे कारण दिले होते. मात्र त्यानंतर या बँकांमध्ये आर्थिक घोटाळे झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली.
हेनन प्रांतातील पोलिसांच्या मते काही गुंडांनी येथील बँकांवर नियंत्रण मिळवले आहे. ज्यामुळे या बँकांमध्ये खडखडाट झाला आहे. ठेवीदारांना पैसे परत करण्याइतपत त्यांच्याकडे निधी शिल्लक राहिलेला नाही असेही बोलले जात आहे. चीनमध्ये एखाद्या बँकेला तिच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त डिपॉझिट स्वीकारण्यास परवानगी नाही. मात्र कोराना काळात काही बँकांनी आणि छोट्या फायनान्स कंपन्यांनी हा नियम गुंडाळून इतर प्रांतातून ठेवी स्वीकारल्या. यात काहांनी जादा व्याजदराचे आमिष दाखवून लाखो युआनच्या ठेवी स्वीकारल्या. सर्वसाधारणपणे बँक ऑफ चायनाचा पाच वर्ष कालावधीसाठी डिपॉझिट रेट 2.75 % आहे. मात्र काही बँकांनी पैसे गोळा करण्यासाठी ठेवीदारांना थेट 4.75% व्याजाचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारल्या आहेत. काहींनी थर्ड पार्टी कंपनीच्या माध्यमातून ठेवी स्वीकारल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. ज्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सातत्याने होत असलेल्या आंदोलनानंतर अखेर चीनमधील बँकिंग नियंत्रकाने ठेवीदारांना अशंत: पैसे काढण्यास परवानगी दिली आहे. ठेवीदारांना खात्यातून 50 हजार युआन काढण्यास मुभा देण्यात आली असली तरी बँका मात्र पैसे परत करण्यास धजावत नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाची लाट आहे.
भांडवल उभारणीची धडपड, बँकांकडून प्रचंड बॉण्ड विक्री
- आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी बँकांनी भांडवल उभारणीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. बँकांनी वर्ष 2022 मध्ये 27 जुलैपर्यंत 568 बिलियन युआन (84 बिलियन डॉलर्स) बॉंड विक्री केली आहे.
- चीनमधील चारही प्रमुख बँकांनी टिअर-1 आणि टिअर-2 बॉंडची विक्री केली. त्याशिवाय बँक ऑफ हेबई कॉ. चेंगडू रुरल कमर्शिअल बँक कॉ आणि बँक ऑफ शांघाई कॉ. या बँकांनी देखील बॉंडची प्रचंड विक्री करुन पैसे उभारण्याचा प्रयत्न केला.
- बँकिंग संकटाने खडबडून जागे झालेले चीनी सरकार छोट्या आणि मध्यम स्वरुपातील बँकांच्या मदतीसाठी सरसावले आहे. सरकारने स्पेशल बॉंड इश्यू करुन 320 अब्ज युआन बँकांसाठी उपलब्ध केले.
बुडीत कर्जे रेकॉर्ड पातळीवर
चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकांची बुडीत कर्जे 2.95 ट्रिलीयन युआन या रेकॉर्ड पातळीवर गेली आहेत. मागील सहा महिन्यात या 107 अब्ज युआनची भर पडली. 316 हाय रिस्क श्रेणीतील बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये 90 % या ग्रामीण आणि काऊंटी बँका आहेत. या बँकांचा एकूण कर्जात 29 % वाटा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक संकट गंभीर समस्या बनली आहे.
कर्जदार आक्रमक, अपूर्ण घरांची कर्जफेड थकित
चीनमधील बांधकाम क्षेत्राची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. अपूर्ण आणि अर्धवट आणि निर्माणाधीन अवस्थेतील (Under Construction Project's) घरांची मॉर्टगेज पेमेंट्स (मालमत्ता गहाण ठेवून घेतलेली कर्जे) कर्जदारांनी थकवली आहेत. चीनमधील एकूण कर्जांमध्ये मॉर्टगेज कर्जांचा तब्बल 20 टक्के वाटा आहे. त्यामुळे बँका हवालदील झाल्या आहेत.
चीनमधील 50 शहरांमध्ये तब्बल 300 हून अधिक हाऊसिंग प्रोजेक्ट्समधील कर्जदारांनी कर्ज फेड करणे थांबवले आहे. या प्रकल्पात पुन्हा काम सुरु होत नाही. तोवर कर्ज फेड न करण्याचा आक्रमक पवित्रा ग्राहकांनी घेतला आहे. जूनपासून आंदोलनाची ही नवी पद्धत चीनमध्ये झपाट्याने फोफावत आहे.
भारतावर काय होणार परिणाम?
चीनमधील बँकिंग आणि रिअल इस्टेटमधील आर्थिक संकटाचे भारतासह जागतिक पातळीवर परिणाम होतील. चीनमधील रिअल इस्टेटला डोलारा कोसळला तर त्याचा परिणाम जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांवर होऊ शकतो. आशियात चीननंतर भारत हाच झपाट्याने वृद्धी करणारा देश आहे. चीनमध्ये होणारे नुकसान गुंतवणूदारांचा आशियाई बाजारपेठेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. त्यामुळे भारतातील गुंतवणुकीला झळ बसू शकते.
चीनी बँकांचा आर्थिक डोलारा कोसळण्याची कारणे
- कोव्हिड-19 अर्थात कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका
- चीनमधीन बांधकाम क्षेत्र पुरता कोलमडले, कर्जदारांनी अंडर कन्स्ट्रक्शन घरांचे कर्ज (Mortgage Payment's) फेडणे थांबवले.
- वर्ष 2021 मध्ये एव्हरग्रांडे या बड्या रिअल इस्टेट कंपनी कर्ज फेडण्यास अपयशी ठरली होती
- बड्या बिल्डर्स आणि रिअल इस्टेट कंपन्या कर्ज हप्ते फेडू शकल्या नाही (Loan Default by Real Estate Companies)
- नजीकच्या काळात पैसा कमी पडणार हे लक्षात घेत बँकांकडून भाग भांडवल वाढवण्यासाठी प्रयत्न
- चालू वर्षाच्या सलग दोन तिमाही बँकांचे भांडवल पर्याप्तता प्रमाण झपाट्याने खाली आले
- कोरोना संकट काळात बुडीत कर्जाचे प्रमाण झपाट्याने वाढले, सध्या चीनी बँकांचे एकत्रित बुडीत कर्ज
- खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण, पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर रिघ
- हेनिन प्रांतात चार प्रमुख बँकांनी एप्रिलपासून ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध घातले आहेत.
- त्यामुळे हेनन प्रांतात प्रचंड असंतोष, मे महिन्यापासून बँक ग्राहकांकडून आंदोलन
- चीनमधील विद्यमान बँकिंग आर्थिक संकट म्हणजे 2008 च्या जागतिक महामंदीची चाहूल
- अमेरिकेत 2008 मध्ये अशाच प्रकारे लेहमन ब्रदर्स ही बडी वित्तीय संस्था कोलमडल्याने आर्थिक संकट ओढवले होते.
Image source:https://tinyurl.com/4582p56u