चीनच्या (China) काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या BF.7 (Omicron BF.7 Variant) व्हेरियंटने धुमाकूळ घातलाय. आणि तिथल्या 18% जनतेला कोव्हिडचा संसर्ग झाल्याचं बोललं जातंय. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चीनला दर दिवशी तिथली कोव्हिड आकडेवारी उघड करण्याची सक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) पहिल्यांदा जनतेसमोर आले. न्यू ईयरच्या (New Year) निमित्ताने जनतेला संबोधित करताना त्यांनी कोव्हिडशी सरकारी यंत्रणा देत असलेला लढा आणि झिरो कोव्हिड धोरणाला लोकांचा झालेला विरोध या दोन्हीविषयी माहिती दिली.
‘चिनी यंत्रणा सर्वोत्तम पातळीवर कोव्हिडशी लढा देतेय. आणि त्यासाठी आपला दृष्टिकोण विज्ञानाधारित आहे,’ असं ते म्हणाले.
त्याचवेळी झिरो कोव्हिड धोरणाविरोधात जनतेमध्ये असलेला असंतोषही त्यांनी मान्य केला. ‘नवीन लाटेत चीनसमोर नवीन आव्हानं आहेत. त्यामुळे सरकारचा कोव्हिडविरोधातला दृष्टिकोणही नवा आहे,’ असं ते म्हणाले. झिरो कोव्हिड धोरणामुळे आधीच चीनला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात सलग तिसऱ्या वर्षी अख्खी सरकारी यंत्रणा कोव्हिडचा सामना करण्यात लागल्यामुळे देशावर आणखी आर्थक ताण पडणार आहे.
झिरो कोव्हिड धोरणाला झालेल्या विरोधामुळे चिनी सरकारने 7 डिसेंबरपासून लॉकडाऊनचे निर्बंध हळू हळू उठवायला सुरुवात केली. पण, त्यामुळे गर्दी वाढून पुढच्या पंधरा दिवसांत तिथले रुग्ण पटापट वाढायला लागले. आता त्याचा ताण आर्थिक यंत्रणेवर बसतो आहे.
चीनसमोर आरोग्य आणि अर्थविषयक संकट Health & Economic Crisis in China
कोव्हिड उद्रेकानंतर चीनमधला सगळ्यात मोठा रिअल इस्टेट उद्योग बसला आहे. वस्तू आणि सेवांची मागणी कमी झाली आहे. आणि जागतिक पुरवठा साखळीत असलेलं देशाचं स्थानही काही प्रमाणात धोक्यात आलं आहे. शी जनपिंग यांनी जनतेशी टीव्हीवरून संवाद साधला त्याच्या एक दिवस आधी त्यांनी आर्थिक आकडे प्रसिद्ध केले होते. आणि त्यातूनच मंदीसदृश परिस्थिती लोकांसमोर आली. 2022 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर 3% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे शीजिनपिंग आणि त्यांच्या सरकारसमोर आव्हान आहे ती अर्थव्यवस्था सुधारण्याचं. आणि बरोबरीने कोव्हिडशी दोन हात करण्याचं.
देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे ही जबाबदारी देण्यात आली असून त्यांना लोकांना कमी मुदतीचं आणि कमी व्याजाचं कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन वर्षात चीनची अर्थव्यवस्था सुरुवातीला धिमीच असेल. पण, जूननंतर तिला उभारी येऊ शकेल असा विश्वास अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.